

आशिष शिंदे
कोल्हापूर : प्रशांत महासागरात सक्रिय झालेल्या अल निनोचा परिणाम मान्सूनच्या सुरुवातीलाच दिसू लागला आहे. भरपूर पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात १४ जूनअखेर यंदा केवळ ४४ मिमी पावसाची नोंद झाली असून, गेल्या पाच वर्षांच्या ६४.३ मिमी सरासरीच्या तुलनेत हा पाऊस सुमारे ३२ टक्क्यांनी कमी आहे. २०२३, २०१५ आणि २००९ या एल निनो वर्षांप्रमाणेच यंदाही जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने ओढ दिल्याचे चित्र दिसत आहे. तर, गेल्या दोन दशकांत सात वेळा पहिल्या पंधरवड्यात इतका कमी पाऊस झाला आहे.
हवामान विभागाच्या नोंदींनुसार गेल्या दोन दशकात मान्सूनची इतकी संथ सुरुवात केवळ सहा वेळाच झाली आहे. २०२३, २००७, २०२२, २००९, २००५ आणि २०१७ या वर्षांनंतर यंदाची नोंद सातव्या क्रमांकाची कोरडी सुरुवात ठरत आहे. जिल्ह्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात कधी भरघोस तर कधी अत्यल्प पाऊस पडल्याचे चित्र गेल्या दोन दशकांच्या आकडेवारीतून दिसते. २००४ मध्ये १५ जूनपर्यंत तब्बल २८५.२ मिमी पाऊस झाला होता. २००८ मध्ये २७९.५ मिमी, तर २०११ मध्ये २५९.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. याउलट २०२३ मध्ये केवळ १५.४ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर २००७ (२९.१ मिमी), २०२२ (३० मिमी), २००९ (३३.६ मिमी), २००५ (३७.२ मिमी) आणि २०१७ (३९.६ मिमी) या वर्षांमध्येही जूनचा पहिला पंधरवडा कोरडा राहिला होता. यंदाचा पाऊस या सर्व वर्षांनंतर सातव्या क्रमांकाचा निच्चांकी आहे.
दोन दशकांतील सर्वाधिक कोरडे पहिले पंधरवडे
२०२३ : १५.४ मिमी
२००७ : २९.१ मिमी
२०२२ : ३०.० मिमी
२००९ : ३३.६ मिमी
२००५ : ३७.२ मिमी
२०१७ : ३९.६ मिमी
२०२६ : ४४.० मिमी
अल निनो वर्षांतील कोल्हापूरचा पंधरवडा
२००९ : १५ जूनपर्यंत ३३.६ मिमी पाऊस
२०१५ : १५ जूनपर्यंत ५८.४ मिमी पाऊस
२०२३ : १५ जूनपर्यंत केवळ १५.४ मिमी पाऊस
२०२६ : १४ जूनअखेर ४४.० मिमी पाऊस
कोल्हापूरातील गेल्या काही अल निनो वर्षांच्या नोंदी पाहिल्यास जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचा वेग मंदावल्याचे चित्र दिसते. एल निनो म्हणजे प्रत्येक वेळी दुष्काळच असे नसले तरी मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात पावसाचा वेग कमी होणे, पावसात खंड पडणे किंवा वितरण असमान राहणे अशी लक्षणे अनेकदा दिसून येतात.
डॉ. प्रशांत पाटील, भूगोलशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ