

जयसिंगपूर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानचा आता कायमचाच बंदोबस्त होणार आहे. हा पूर्वीचा भारत नाही, तर घुसून मारणारा भारत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व म्युझियम शिवतीर्थ लोकार्पण सोहळा सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. भारतीय सैनिक पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवरायांचा पुतळा प्रेरणा व ऊर्जा देणारा आहे, तसेच म्युझियम व ग्रंथालय भावी पिढीला प्रेरणा देईल. येथून नवी पिढी देश व राज्याची सेवा करेल, असेही शिंदे यांनी सांगितले.
कोल्हापूरचे पंचगंगा प्रदूषण असो वा महापूर, यावर सरकार काम करीत आहे. शेतकर्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे हे सरकार असून, कोणी काहीही म्हणो, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. या राज्यास दुप्पट-तिप्पट विकास करण्यासाठी आमचे ट्रिपल इंजिन सरकार मजबूत असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
गेल्या 50 वर्षांपासून मागणी असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला. जयसिंगपूरला विकासाचे मॉडेल करण्यासाठी लागेल तितका निधी दिला जाईल. सकाळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर व त्यांच्या पत्नी नितू पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, 10 जोडप्यांच्या हस्ते शिवतीर्थाचे वास्तुशांती पूजन व होम संपन्न झाला.
स्वागत व प्रास्ताविक करताना आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूरकरांचे 40 वर्षांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. शाहू महाराजांनी वसवलेले शहर हे प्रचंड विस्तारले आहे. पुतळ्यासाठी विनामोबदला सरकारने जागा उपलब्ध करून दिल्यामुळे 7 कोटी 50 लाख निधीतून भव्य असे शिवतीर्थ साकारले आहे.
टाकळीवाडी येथे औद्योगिक वसाहतीचा लवकरच शुभारंभ होणार आहे. जयसिंगपूर शहराला 250 कोटी रुपयांचा निधी दिला असून, पालिकेची 7 मजली इमारत, स्टेडियम, भुयारी गटार, पाणी योजना पूर्ण होत आहे. त्याचबरोबर हे व्यापार्यांचे शहर शैक्षणिक आणि उद्योगासाठी प्रसिद्ध झाले आहे. जयसिंगपूर येथील रेल्वे उड्डाणपूल व भूमिगत विद्युतवाहिन्या करण्यासाठी शासनाने निधी द्यावा, असे त्यांनी सांगितले.
जयसिंगपूरचे शिवतीर्थ हे नागरिकांसाठी आदर्श ठरेल. राजकारण बाजूला ठेवून विकासकामे पूर्ण करण्यासाठी सरकारने जयसिंगपूरप्रमाणे कोल्हापूरलाही निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार शाहू महाराज यांनी केली.
जयसिंगपूर येथे उभारलेले शिवतीर्थ हे पश्चिम महाराष्ट्रातले सर्वात मोठे आहे. ग्रंथालय, म्युझियम यासह विविध विकासकामांमुळे शहरातील नागरिकांना सोयीसुविधा मिळत असून, या पंचक्रोशीला पुढे नेण्याची जबाबदारी आमच्यावर असून, ती आम्ही पूर्ण करू, असे खासदार धैर्यशील माने म्हणाले.
आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा नगरपालिकेच्या वतीने मानपत्र देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आयएएस आदिती चौगुले, नौदलात निवड झालेल्या आदिती जाधव, प्रीती मेंढगुले, मूर्तिकार प्रशांत मयेकर, ठेकेदार विक्रम गायकवाड आदींचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अशोकराव माने, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्याधिकारी टीना गवळी, संजय मंडलिक, प्रांताधिकारी मौसमी चौगुले, स्वरूपा पाटील-यड्रावकर, सुजित मिणचेकर, मुरलीधर जाधव, सावकर मादनाईक, रवींद्र माने, सतीश मलमे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले. अस्लम फरास यांनी आभार मानले.