

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला नसला तरी धरणसाठ्यात संथ वाढ सुरूच आहे. जिल्ह्यातील प्रमुख 17 प्रकल्पांपैकी आठ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तीन धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. दोन धरणांत 75 टक्क्यापेक्षा जादा पाणीसाठा असून 3 धरणांत 80 टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसाने धरणातील पाणीसाठा जूनच्या पहिल्याच आठवड्यात समाधानकारक झाला होता. यामुळे यावर्षी धरणे लवकर भरतील अशीही शक्यता होती. मात्र, जुलै महिन्यात पावसाने दडी मारली. पावसाचा जोर गेल्या 15-20 दिवसांपासून ओसरल्याने धरणातील पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत आहे.
पाणीसाठ्यात संथ वाढ होऊनही जिल्ह्यातील तब्बल आठ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. उर्वरित नऊ धरणांपैकी तीन धरणे येत्या चार-पाच दिवसांत भरतील, अशी शक्यता आहे. उर्वरित धरणांपैकी दोन धरणांत 75 टक्क्यापेक्षा जादा पाणीसाठा आहे तर तीन धरणांत 80 टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे.
राधानगरी धरण 96 टक्के भरले आहे. 8.36 टीएमसी क्षमता असलेले धरण गुरूवारी दुपारी 4 पर्यंत 8.02 टीएमसी भरले आहे. यामुळे राधानगरी धरण येत्या तीन-चार दिवसांत पूर्ण क्षमतेने भरेल अशी शक्यता आहे.
जिल्ह्यातील प्रमुख 17 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता 93.95 टीएमसी इतकी आहे. गुरुवार, दि.24 जुलै रोजी दुपारी चार वाजेपर्यंत जिल्ह्यातील धरणे सरासरी 87.11 टक्के भरली असून, धरणांत 78.59 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.