Drug Case | ड्रग्जप्रकरणी काजू उद्योजकासह आठजण जेरबंद

मोठी साखळी; गुंतवणूकदार मुंबई, बेळगावमधील : साहित्य जप्त
Sangli Crime News
तासगाव न्यायालय आवारात सहा संशयित घातक हत्यारांसह जेरबंदFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर/चंदगड : चंदगड व बेळगाव तालुक्यांच्या सीमेवर हाजगोळी ते सरोळी (ता. चंदगड) या रस्त्यावरील पोल्ट्री फार्ममध्ये दीड कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज तयार करण्या‍साठी वापरण्‍यात येणारे रसायन, पावडर आणि साहित्‍य जप्त केले. याप्रकरणी काजू उद्योजकासह आठजणांना जेरबंद केले.

या पोल्ट्री फार्ममध्ये सात तरुण आढळून आले. त्यांच्याकडे ‘टू ब्रोमो फोट मिथाईल प्रोईओ फेनॉन’ ही खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी सुमारे ४० किलो पावडर आणि मेफेटरमाईन हे दहा किलो रसायन आढळून आले. फोर्सने ते जप्त केले. त्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवस सुरू असलेल्या या कारवाईचा पोलिसांनी कोणालाच सुगावा लागू दिला नाही. गोपनीयरीत्या कारवाई करत हा कारखानाच उद्‌ध्‍वस्त करत महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह आंतरराज्य रॅकेटही उद्‌ध्वस्त केले. याप्रकरणी मोठी आंतरराज्य साखळी कार्यरत असल्याचेही समोर आले. या कारखान्यासाठी मुंबई, बेळगावमधील काहींनी गुंतवणूक केल्याचेही समोर आले आहे. तपासानंतर त्यांच्याही मुसक्या आवळल्या जाणार आहेत.

याप्रकरणी मुख्य संशयित पप्पू विठ्ठल मलतवाडकर (वय ३०) याला ताब्यात घेतले. त्‍याच्‍याक‍डून अन्य आरोपींची माहिती घेण्यात आली. त्यात चंदगड तालुक्यातील तुडिये परिसरातील आणखी सराईत गुंडांचे नाव समोर आले. संतोष सदानंद बसरीकट्टी (३०, रा. तुडये, ता. चंदगड), किरण अशोक शिंदे (२९, रा. तुडये, ता. चंदगड), रोहित शिंदे (३०, रा. हाजगोळी, ता. चंदगड) यांच्यासह आठजणांना जेरबंद केले. या सर्वांना घेऊन हे पथक शनिवारी रात्री उशिरा मुंबईकडे रवाना झाले.

चंदगड तालुक्यात तिसऱ्यांदा कारवाई

हाजगोळी येथे झालेली कारवाई चंदगड तालुक्यातील अमली पदार्थविरोधी तिसरी कारवाई असून, यापूर्वी ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे एमडी ड्रग्ज फॅक्टरी सुरू होती, ही मुंबई पोलिसांनी उघडकीस आणली. यानंतर म्हाळेवाडी (ता. चंदगड) या ठिकाणी एका फार्मासिस्ट तरुणाला अटक केल्यानंतर ड्रग्जनिर्मितीचे कारनामे उघडकीस आले होते. आता तिसऱ्यांदा हाजगोळी येथे कारवाई झाल्याने सीमाभागात खळबळ उडाली आहे.

मोठा फौजफाटा घटनास्थळी

घटनास्थळी अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी एम. एम. मकानदार, गडहिंग्लज उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक विवेक पाटील, चंदगडचे पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्यासह स्थानिक पोलिस, कोल्हापूर पोलिस, तसेच पुणे अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचा मोठा फौजफाटा घटनास्थळी ठाण मांडून होता.

तस्करी टोळीचा पर्दाफाश

मुंबईसह पुणे येथील अमली पदार्थविरोधी पथकाने सांगली जिल्ह्यातील २०२३ मध्ये मिरज तालुक्यातील कुपवाड व कवठेमहांकाळ तालुक्यात छापेमारी करून कोट्यवधी रुपये किमतीचा ड्रग्जसाठा हस्तगत केला होता. सांगली जिल्ह्यातील कारवाईनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ड्रग्जनिर्मिती आणि तस्करी टोळीचा पर्दाफाश झाला.

बंदी घातलेली पावडर

‘टू ब्रोमो फोट मिथाईल प्रोईओ फेनॉन’ या खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरवर केंद्र शासनाने मार्च २०२६ मध्ये बंदी घातली आहे. मात्र, तत्पूर्वीचा उपलब्ध असलेला साठा ७ सप्टेंबर २०२६ पूर्वी वापरण्यास मुभा दिली आहे. याचा फायदा घेत संबंधितांनी काळ्याबाजारातून ही पावडर एक लाख रुपये किलो याप्रमाणे खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे.

गुटख्याचा कारखाना म्हणून बनाव

या पोल्टी फार्ममध्ये परिसरातील कोणी आले तर त्यांना वेगळाच वास यायचा. यावेळी संबंधित हा गुटख्याचा कारखाना आहे, असे सांगायचे. कोणाला सांगू नका; पण थोडा गुटखा तयार करून विक्री करतोय, असे ते सांगायचे. यामुळे स्थानिकांना या ड्रग्ज करखान्याबाबत फारशी शंका आली नाही.

तीन राज्यांच्या सीमा आणि साठा लपवण्यासाठी सुरक्षित जागा

चंदगड व बेळगाव तालुक्यांच्या सीमेवर दुर्गम भागात हा गैरप्रकार सुरू होता. या ठिकाणापासून महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यांच्या सीमा आहेत. त्यामुळे ड्रग्ज तस्करांना हा भाग सोयीचा होता. यादरम्यान, बेळगाव येथील काही ड्रग्ज पेडलर्सनी केवळ साठा लपवून ठेवण्यासाठी योग्य जागा म्हणून या पोल्ट्री फार्मचा वापर केला की या ठिकाणी ड्रग्जनिर्मिती व्हायची, यादृष्टीनेही तपास सुरू आहे.

पावडरची प्यूअरिटी ९७ टक्के; म्हणून ड्रग्जसाठी वापर

‘टू ब्रोमो फोट मिथाईल प्रोईओ फेनॉन’ या पावडरची प्युअरिटी ९० टक्‍क्‍यांच्‍या आत असेल, तर ती पावडर खतासाठी वापरली जाते. जप्त केलेल्या पावडरमध्ये ९७ टक्के प्युअरिटी आढळून आली. यामुळे याचा वापर ड्रग्जसाठीच केला जात होता, त्याकरिता ते काळ्याबाजारातून खरेदी केल्याचेही समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news