

पूनम देशमुख
कोल्हापूर : उच्च शिक्षण, परदेशी नोकर्या, स्टार्टअप्स, आर्थिक स्वावलंबन आजची महिला आयुष्याची दिशा स्वतः ठरवत आहे. मात्र, या नियोजनात एक घटक तिच्या नियंत्रणाबाहेर राहतो, तो म्हणजे शरीराचे जैविक घड्याळ. करिअर घडवताना मातृत्व पुढे ढकलण्याची वेळ येते आणि याच टप्प्यावर एग (स्त्री बीज) फ्रिझिंग हा पर्याय चर्चेत येतो. विज्ञानाने दिलेल्या या पर्यायामुळे महिलांना भविष्यातील मातृत्वासाठी वेळ जतन करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. गेल्या दशकात देशभरात एग फ्रिझिंग प्रकियांमध्ये 35 ते 40 टक्क्यांची वाढ झाल्याचे फोर्ब्स इंडियाच्या अहवालातील निरीक्षण आहे. दरवर्षी या सायकलमध्ये वाढ होत असून मुंबई, दिल्ली, बंगळूर यांसारख्या महानगरांसह आता कोल्हापूरमध्येही चौकशी पाचपट वाढल्याचे निदर्शनास येत आहे. काही प्रमुख फर्टिलिटी सेंटर्समध्ये दरमहा 2 ते 3 महिला हा पर्याय स्वीकारत असल्याची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाते.
वैद्यकीय भाषेत ओसाईट क्रायोप्रिझर्वेशन म्हणून ओळखली जाणारी ही प्रक्रिया म्हणजे स्त्री बीज शरीरातून बाहेर काढून अत्यल्प तापमानात सुरक्षित साठवून ठेवणे. वाढत्या वयामुळे एग्जच्या गुणवत्तेत होणारी घट टाळण्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरते. भविष्यात गर्भधारणेची इच्छा असल्यास हे स्त्री बीज वितळवून तंत्राद्वारे भ्रूण तयार केला जातो. या प्रक्रियेपूर्वी ओव्हेरियन रिझर्व्ह तपासण्यासाठी रक्तचाचण्या, हार्मोनल तपासणी आणि अल्ट्रासाऊंड केले जाते. त्यामुळे अपेक्षित यशाचा अंदाज बांधता येतो.
एका सायकलचा खर्च : 01 ते 2.5 लाख रुपये
हार्मोनल औषधांचा खर्च स्वतंत्र
वार्षिक स्टोरेज शुल्क अतिरिक्त
करिअर-उच्च शिक्षणामुळे मातृत्व पुढे ढकलणार्या महिला
उशिरा विवाहाची योजना असलेल्या महिलांसाठी
कर्करोगासारख्या आजारांवरील उपचारांपूर्वी प्रजननक्षमता जपण्यासाठी
वैयक्तिक किंवा सामाजिक कारणांमुळे तात्पुरती गर्भधारणा टाळू इच्छिणार्या महिला