शक्तिपीठ महामार्गासाठी सर्वसहमतीचे प्रयत्न

गैरसमज दूर करण्यासाठी सर्वपक्षीय व्यापक बैठक घ्या ः चर्चासत्रात सूर
Shaktipeeth Highway
शक्तिपीठ महामार्ग File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण झाल्यास औद्योगिक, आय.टी. क्षेत्रासह पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गप्रश्नी सर्वपक्षीय व्यापक बैठकीचे आयोजन करून गैरसमज दूर करावेत, असा सूर शक्तिपीठ महामार्गासंदर्भात क्रेडाईच्या वतीने आयोजित ‘समज, गैरसमज, गरज’ चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी सर्वांना विश्वासात घेऊनच महामार्ग होईल, अशी स्पष्ट ग्वाही दिली.

क्रेडाईचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी, राज्यात शासनाच्या वतीने करण्यात येणारा हा महामार्ग जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा असेल. त्यामुळे जिल्ह्यात रोजगारनिर्मितीसह व्यापारवाढीला चालना मिळणार आहे. या महामार्गाबाबत नागरिकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. हा महामार्ग झाल्यास कोल्हापुरात गुंतवणूक वाढीस चालना मिळणार असल्याचे नमूद केले.

आ. क्षीरसागर यांनी, नागपूर - गोवा शक्तिपीठ शीघ—संचार द्रुतगती महामार्गाच्या कामाची माहिती दिली. ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गात राज्यातील 12 जिल्हे जोडले जाणार आहेत. या महामार्गामुळे 18 तासांचा प्रवास 8 तासांवर येणार आहे. यामुळे दळणवळणात वाढ होवून पर्यटनवाढीस चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे होणार्‍या नुकसानीपेक्षा होणारा विकास अधिक पटीने असणार आहे. याचा फायदा स्थानिक नागरिकांनाच होणार आहे. त्यामुळे यात कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. समृद्धी महामार्गामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात औद्योगिक गुंतवणूक वाढली आहे. परंतु, कोल्हापूरची भौगोलिक स्थिती पूरक असतानाही असे प्रकल्प झाले नसल्याने जिल्ह्याची पीछेहाट झाली आहे. याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. सर्वांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन आ. क्षीरसागर यांनी केले.

विधानसभा निवडणूक कालावधीत विरोधकांनी शक्तिपीठ महामार्गाविषयी शेतकर्‍यांत गैरसमज पसरविले. निवडणुकीत हा कळीचा मुद्दा बनविण्यात आला. मात्र आता पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे दोघेही महायुतीचे मंत्री आहेत. त्यामुळे आम्ही सर्व आमदार, मंत्री एकत्र येऊन शक्तिपीठाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. त्यासाठी दोन्ही मंत्र्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतील, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीस क्रेडाई महाराष्ट्र उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, उपाध्यक्ष गौतम परमार, सेक्रेटरी संदीप मिरजकर, संजय शेटे, श्रीकांत पोतनीस, संदीप पाटील, आय.टी.असोसिएशनचे विश्वजित देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत मांडण्यात आलेल्या सूचना

  • महामार्ग प्रकल्पात बाधित होणार्‍यांचे प्राधान्याने पुनर्वसन व्हावे किंवा त्यांना योग्य दराप्रमाणे आर्थिक मोबदला द्यावा.

  • महामार्गानजीक व्यापारासाठी प्रयोजन असेल तर त्याठिकाणी प्रकल्पबाधित आणि स्थानिक नागरिकांनाच प्राधान्य द्यावे.

  • प्रकल्पाच्या कामात स्थानिक मनुष्यबळाचा प्राधान्याने वापर करावा.

  • महामार्गाला सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची कनेक्टिव्हिटी ठेवावी.

  • प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर-शिर्डी, कोल्हापूर-गुजरात सीमा भाग जोडण्यासाठी प्रयत्न करावेत.

  • महामार्गामध्ये नद्यांचा संगम क्षेत्र येत असल्याने प्रकल्पामुळे पूरबाधित क्षेत्र वाढून शेतीचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

  • महामार्गासंदर्भात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी शासनस्तरावर व्यापक बैठकीचे आयोजन करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news