

कोल्हापूर : दै.‘पुढारी’ एज्यु-दिशा शैक्षणिक प्रदर्शनात बाहेर मुसळधार पाऊस कोसळत असताना तीन दिवस शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. नवीन कोर्सेससह राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांची माहिती जाणून घेतली. तज्ज्ञ मान्यवरांनी दर्जेदार अभ्यासक्रम, कोर्सेसबद्दल विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी ‘दिशा’ मिळाली. संस्थांची माहिती व ज्ञानसत्रात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थी, पालकांनी समाधान व्यक्त केले. उत्साहाने भारावलेल्या वातारणात प्रदर्शनाची यशस्वी सांगता झाली.
राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन सभागृहात 23 ते 25 मे दरम्यान दै. ‘पुढारी’च्या वतीने एज्यु-दिशा शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे संजय घोडावत युनिव्हर्सिटी मुख्य प्रायोजक तर पॉवर्ड बाय प्रायोजक म्हणून पुणे येथील विश्वकर्मा युनिव्हर्सिटी होते. पुणे येथील एम. आय. टी. विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी व भारती विद्यापीठ प्रदर्शनाचे सहयोगी प्रायोजक होते. पीसीईटीज पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, पुणे, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे, एम. आय. टी. ए. डी. टी. युनिव्हर्सिटी, पुणे व चाटे शिक्षण समूह सहप्रायोजक होते.
प्रदर्शनात राज्याच्या कानाकोपर्यातून विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांचे सुमारे 40 हून अधिक स्टॉल होते. तीन दिवस सलग मुसळधार पाऊस असला तरीदेखील विद्यार्थी व पालकांनी प्रदर्शनात सहभागी होऊन विविध कोर्सेस, शैक्षणिक संस्थांचे प्रवेश शुल्क, वसतिगृह सुविधा यासह अन्य गोष्टींची माहिती जाणून घेतली. रविवारी शेवटच्या दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची तुडुंब गर्दी झाली होती. यूपीएससी, एमपीएससी, इंजिनिअरिंग, मेडिकल, नीट व जेईई प्रवेश परीक्षा, व्हीएफएक्स, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, पर्यावरण, जैवतंत्रज्ञान आदी अभ्यासक्रम व क्षेत्राशी निगडित स्टॉलला विद्यार्थ्यांनी भेट दिली.
बारावीनंतर उच्च शिक्षणातील संधी, आर्टिफिशयल इंटिलिजन्स, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व फायदे, सीएमधील करिअरच्या संधी, राष्ट्रीयीकृत बँका, एलआयसी यासह केंद्रीय कर्मचारी भरती या विषयावरील विविध ज्ञानसत्रात तज्ज्ञ मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरचा गुरुमंत्र देत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. शंकांचे समर्पक निरसन केले. प्रदर्शनाच्या उद्घाटनापासून शेवटच्या दिवसापर्यंत विद्यार्थी, पालकांची शैक्षणिक माहिती जाणून घेण्यासाठीची उत्सुकता कायम होती.
एकाच छताखाली करिअरसाठी आवश्यक अभ्यासक्रमाची माहिती व शैक्षणिक संस्थांची ओळख विद्यार्थ्यांना झाली. जूनमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ‘एज्यु-दिशा’ शैक्षणिक प्रदर्शनातून करिअरचा नवा राजमार्ग सापडल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.