

कोल्हापूर : दहावी, बारावीनंतरच्या शैक्षणिक संधी, करिअरबाबत एकाच छताखाली विद्यार्थ्यांना माहिती मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे समाधान झाले. भर पावसातही शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थांच्या करिअरला नवी दिशा मिळाली.
राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात दै.‘पुढारी’च्या वतीने एज्यु-दिशा शैक्षणिक प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनाचे संजय घोडावत युनिव्हर्सिटी मुख्य प्रायोजक तर पॉवर्ड बाय प्रायोजक म्हणून पुणे येथील विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहेत. पुणे येथील एम. आय. टी. विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी व भारती विद्यापीठ प्रदर्शनाचे सहयोगी प्रायोजक आहेत. पीसीईटीज पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, पुणे, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे, एम. आय. टी. ए. डी. टी. युनिव्हर्सिटी, पुणे व चाटे शिक्षण समूह सहप्रायोजक आहेत. प्रदर्शनात पारंपरिक अभ्यासक्रमांसह इंजिनिअरिंग, मेडिकल, अॅग्रीकल्चर, आर्टिफिशील इंटिलिजन्सचे शिक्षण देणार्या कोल्हापूरसह पुणे, मुंबई, सातारा येथील नामांकित संस्था सहभागी झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पाऊस सुरू असतानाही विद्यार्थी, पालकांनी एज्यु-दिशा शैक्षणिक प्रदर्शनास भेट दिली. प्रदर्शनात सहभागी नामांकित शिक्षण संस्थांच्या प्रत्येक स्टॉलवर जाऊन विद्यार्थ्यांनी चांगले महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, नवीन कोर्सेस, शैक्षणिक शुल्क, वसतिगृह सुविधा, शिष्यवृत्ती यासह आवश्यक कागदपत्रे, देश व परदेशातील शिक्षण व रोजगाराच्या संधी याबाबत माहिती जाणून घेतली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या मनातील शैक्षणिक संधी व करिअरबाबतचा संभ—म दूर झाला आहे.
दै.‘पुढारी’च्या वतीने दहावी, बारावीच्या परीक्षेत 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत आहे. दोन दिवस प्रदर्शनात शहरातील शाळा, महाविद्यालातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शनिवारी सकाळच्या सत्रात बालकल्याण संकुल येथील दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दै.‘पुढारी’ने केलेल्या सत्काराने विद्यार्थ्यांसह पालकदेखील सुखावून गेले होते.
एज्यु-दिशा शैक्षणिक प्रदर्शनात रविवारी (दि.25) रोजी सकाळी 11 ते 12 यावेळेत कोल्हापूर ब—ँच ऑफ दी डब्लूआयआरसी ऑफ आयसीएआयचे चेअरमन सीए नितीन हारूगडे हे ‘चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) मधील करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 12 ते 1 यावेळेत भारतीय स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक अविराज गवळी हे ‘राष्ट्रीयकृत बँका, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे, पब्लिक सेक्टरमधील केंद्रीय कर्मचारी अधिकारी निवड प्रक्रिया, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन याविषयावर व्याख्यान देणार आहेत.
10 वी तसेच 12 वी मध्ये 80 टक्के किंवा त्याहून अधिक गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सदर प्रदर्शनामध्ये दै. ‘पुढारी’ तर्फे ‘गुणवंत विद्यार्थी गौरव 2025’ विशेष सत्कार करण्यात येणार आहे. नाव नोंदणी आवश्यक असून खालील लिंकवर जाऊन अथवा सोबत दिलेल्या टठ कोड स्कॅन करून आपले नाव नोंदणी करता येईल.