

कोल्हापूर : पारंपरिक वाद्यांसह कोल्हापूरला साजेल अशा वातावरणात पर्यावरणपूरक आणि नियमाला बांधिल राहून शहरासह जिल्ह्यात यंदाचा गणेशोत्सव शांततेत, उत्साहात साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यासह प्रशासनाच्या वतीने गुरूवारी करण्यात आले. कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीने यंदापासून गणेशोत्सव मंडळांसाठी गणराया अॅवॉर्ड सुरू करण्यात येत असल्याची घोषणा पोलिस अधीक्षकांनी बैठकीत केली.
शहर, जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या काळात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांची राजर्षी शाहू स्मारक भवन येथे बैठक बोलाविण्यात आली होती. जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी एस. कार्तिकेयन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, अण्णासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला शहरासह करवीर, शिरोली, गोकुळ शिरगाव, गांधीनगर परिसरातील दोनशेवर गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
माजी महापौर आर. के. पवार म्हणाले, शहरात बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचे साम—ाज्य आहे. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीपूर्वी रस्त्यांची तत्काळ डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. अनिल घाटगे यांनी गतवर्षी मिरवणुकीतील लेसर किरणामुळे राजारामपुरी परिसरातील 664 नागरिकांच्या डोळ्यांना बाधा झाली आहे, याकडे लक्ष वेधले. गणेशोत्सव काळात लेसर किरणांचा कार्यकर्त्यांनी मोह टाळावा, असे त्यांनी आवाहन केले. लालासाहेब गायकवाड यांनी गणेशोत्सवापूर्वी शांतता आणि दक्षता समित्यांची पोलिस ठाण्यांतर्गत बैठका घेण्याचे आवाहन केले. महिलांच्या सुरक्षिततेच्या द़ृष्टीने पोलिस यंत्रणेसह गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सरलाताई पाटील, पूजा नाईकनवरे यांनी केले. कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर बोलताना महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी रस्त्यावरील खड्ड्यांसाठी प्रभागवार नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पुरेशा निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुारुस्ती होईल, महिलांच्या स्वच्छतागृहांसह मिरवणुकीला अडथळे ठरणार्या झाडाबाबतही चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, कोल्हापूरला गणेशोत्सवाची साजेशी अशी परंपरा आहे. पर्यावरणपूरक, पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि कायद्याच्या चौकटीत हा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी आवाहन केले. गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही, याची सर्वांनीच दक्षता घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. अक्षय बाफना, संभाजी जगताप, नीलेश बनसोडे, दिलीप देसाई, अशोक देसाई, प्रथमेश मोरे, सोमेश चौगुले, किशोर घाटगे, सुशील भांदिगरे, योगेश हत्तळगे, संग्रामसिंह जरग, युवराज शिंदे सहभागी झाले होते. शहर उपअधीक्षक अजित टिके यांनी आभार मानले.
पारंपारिक वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांच्या पदाधिकार्यांनी प्रयत्न करावेत, ध्वनिक्षेपक मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. यंदापासून पोलिस दलाच्या वतीने गणराय अॅवॉर्ड सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी जाहीर केले.