

कोल्हापूर : राज्यातील सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या १२४ प्राथमिक आरोग्य व शहरी आरोग्यवर्धनी केंद्रांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शनिवारी झाले.
शिंदे म्हणाले, या आरोग्य संस्थेचे लोकार्पण होत आहे हा आरोग्य सेवेसाठी अत्यंत गौरवपूर्ण व अभिमानास्पद क्षण आहे. राज्याला तज्ज्ञ डॉक्टर देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. शासनाने कॅशलेस उपचारांची सुविधा सुरू केली.
आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, १२४ आरोग्य संस्थांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होतो आहे. हा आरोग्य विभागाच्या दृष्टीने अत्यंत संस्मरणीच क्षण आहे. वैद्यकीय मशनरीअभावी अनेक रुग्णालये बंद होती ती कार्यरत करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरही महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. राज्यातील गरीब रुग्ण पैशाअभावी उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. खासगी हॉस्पिटलच्या धरतीवर राज्याच्या आरोग्य विभागाला अद्ययावत करण्याला आपले प्राधान्य राहणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा संदेश सादर करण्यात आला.
आरोग्य सेवा आयुक्त तथा अभियान संचालक संजय काटकर यांनी प्रास्ताविक केले. ऑनलाईन पद्धतीने आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार सर्वश्री किसन कथोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दौलत दरोडा, शरद सोनवणे, प्रकाश सोळंके, विनोद निकोले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक आदी सहभागी झाले होते.