

म्हासुर्ली : दिगंबर सुतार
सध्या नवरात्रोत्सवाची धामधूम चालु झाली आहे. गावागावात उपास तपास व्रत वैकल्यांनी मंदिरे सजली आहेत. दसरा सण मोठा तिथे आनंदाला नसतो तोटा. हाच दसरा ज्यांच्या आयुष्यातील मोठा सण असतो त्याच धनगर बांधवांच्या उत्साहाने जणू डोंगरांना चैतन्य प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रीयन कलासंस्कृतीत अनेक लोककला दडलेल्या आहेत. यापैकीच धनगर लोकांच्या गजनृत्याने डोंगरा डोंगरांवर ताल धरला आहे. विशिष्ट पेहराव परिधान केलेल्या लोकांचा नाच तर त्याला ढोल, थाळी, कैताळाच्या ध्वनीची सुमधूर साथ. याच नृत्याविष्काराने जणू डोंगर कपारींना जाग आल्याचे चित्र आहे. (Navratri Festival)
डोंगररांगांत अगदी डोंगरमाथ्यावर डंगे धनगर समाज वास्तव्य करतो. भौतिक सुविधांची आबाळ तर प्रतिकूल परिस्थितीचा घेराव यातून जीवन जगताना हा समाज आजही आदिवासीं प्रमाणेच जीवन जगतो. डोंगरातील औषधी झाडपाला, मध, मोह, वाळकी लाकडे अशा वनउपज वस्तुंच्या विक्रीतून तर कधी शेळ्या, मेंढ्या पालनातून आपल्या जगण्याला आकार देत असतो. वर्षातील बाराही महिने कष्टदायी प्रवासात जणू डोंगराशी झुंजणाऱ्या या लोकांच्या जीवनात विरंगुळा देणारा, उत्साह वाढवणारा तर चैतन्य निर्माण करणारा दसरा हा सण येतो.
कुठे आठ-दहा घरे तर कुठे पंधरा-वीस घरांनी बनलेला एक धनगरवाडा असतो. प्रत्येकजण कामात व्यस्त असला तरी सण उत्सवाच्या निमित्ताने हा समाज एकत्र येत असतो. डोंगरपहाडी जीवन जगताना जंगली श्वापदांसह पावला पावलाला असणारे धोके पाहता सदोदीत कृपा ठेव रे बाबा म्हणत आपल्या दैवतांना साकडे घालत असतो. नवरात्रोत्सवासह दसऱ्या पर्यंत हा समाज भक्तीरसात लीन झालेला असतो. याच भक्तीचा भाग असलेल्या गजनृत्यकलाविष्काराने तेथील कला - संस्कृतीचे दर्शन घडत असते.
धामणी खोऱ्याच्या दुतर्फा पसरलेल्या डोंगररोगांत अनेक छोटेमोठे धनगरवाडे वसले आहेत. येथील काही लोक परिस्थितीला जाचून शिवाय बाह्यजगाचा वेध घेण्यासाठी स्तलांतरीत होवून शहरांत विस्थापित झालेत. पण गावची माती शिवाय तिथल्या संस्कृतीशी नाळ जराही तुटली नाही. दसऱ्याच्या निमित्ताने त्यांची पावले गावाच्या वेशीकडे थिरकू लागली आहेत. या उत्सवात सर्वच तल्लीन होत एक चैतन्यमयी माहोल बनू लागला आहे. अगदी रात्र-रात्र गजनृत्यातून जणू देवाचा जागर होत असला तरी याच डोंगरमाथ्यांवर महाराष्ट्रीयन मातीत रुजलेल्या लोकसंस्कृती, लोककलेचा जागर होवू लागला आहे.
कास्याची थाळी, ढोल, कैताळाचे वाध्य त्यावर धनगरी फेट्यासह विशिष्ट पेहराव परिधान करुण धरला जाणारा ठेका, अगदी हत्तीच्या शांत चालीने हळुवार हावभाव करत केले जाणारे नृत्य येथील अबाल वृद्धांची मोठी करमणूक करते.
दसरा म्हणजे धनगर जमातीचा उत्सव. या उत्सवातील गजनृत्य हि समाजाची खासियत. एकविसाव्या शतकात अनेक बदल होवूनही हि परंपरा आजही टिकूण आहे.
-विकास मलगुंडे .