Kolhapur Municipal Corporation | डांबरी प्लान्टला कुलूप; रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण!

महापालिकेची डांबरी बॅच बंद झाल्यापासून टिकाऊ पॅचवर्क, रस्ते इतिहासजमा
कोल्हापूर : कसबा बावडा येथील झूम प्रकल्पाजवळ बंद पडलेला डांबरी प्लान्ट.
कोल्हापूर : कसबा बावडा येथील झूम प्रकल्पाजवळ बंद पडलेला डांबरी प्लान्ट. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

डॅनियल काळे

कोल्हापूर : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गेल्या दोन दशकांहून अधिक काळ नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. दर्जेदार रस्ते होणे दूरच; विद्यमान रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे पॅचवर्कही टिकत नसल्याने नागरिकांना खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेचा डांबरी प्लान्ट आणि त्याची डांबरी बॅच पुन्हा सुरू करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

एकेकाळी महापालिकेची डांबरी बॅच खड्डे बुजविण्याचे काम शास्त्रोक्त पद्धतीने करीत होती. खड्ड्यांतील माती आणि सैल भाग पूर्णपणे काढून त्याची स्वच्छता केली जात असे. त्यानंतर मोठी खडी टाकून रोलरच्या साहाय्याने तिचे पिचिंग केले जात असे. खडी व्यवस्थित बसल्यानंतर महापालिकेच्या डांबरी प्लान्टमध्ये तयार केलेला दर्जेदार डांबरमिश्रित माल टाकून पॅचवर्क केले जात होते. त्यामुळे हे पॅचवर्क वर्षानुवर्षे टिकत होते. मात्र, सध्याचे चित्र याच्या अगदी उलट आहे. अनेक ठिकाणी मातीमिश्रित मुरूम किंवा डांबराचे प्रमाण कमी असलेला माल वापरून खड्डे बुजविले जात असल्याने पहिल्याच पावसात पॅचवर्क उखडून जाते. परिणामी, खड्डे बुजविले की, पुन्हा काही दिवसांत त्याच ठिकाणी खड्डा, असे दुष्टचक्र सुरू आहे.

महापालिकेचा डांबरी प्लान्ट आणि डांबरी बॅच बंद झाल्यानंतर शहरातील रस्त्यांच्या गुणवत्तेत सातत्याने घसरण झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ठेकेदारी पद्धतीला वाढलेले प्राधान्य, कामाच्या गुणवत्तेवरील अपुरे नियंत्रण आणि निकृष्ट साहित्याच्या वापरामुळे रस्त्यांची अवस्था अधिकच खालावल्याची नागरिकांची तक्रार आहे.

दर्जेदार कामामुळे डांबरी बॅचवर विश्वास

पूर्वी महापालिकेकडे आठ डांबरी बॅच कार्यरत होत्या. प्रत्येक बॅचमध्ये सुमारे ३५ कर्मचारी होते. दररोज १२ ते १६ डंपर डांबरी मालाचा वापर करून शहरातील रस्त्यांची दुरुस्ती केली जात होती. कामाच्या गुणवत्तेमुळे तत्कालीन नगरसेवक आणि नागरिकांचा या यंत्रणेवर मोठा विश्वास होता. त्यामुळे नगरसेवकांच्या ऐच्छिक निधीतून होणारी रस्त्यांची कामेही महापालिकेच्या याच यंत्रणेमार्फत केली जात होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news