

दत्तवाड : पुढारी वृत्तसेवा
दत्तवाड तालुका शिरोळ येथील दूधगंगा नदीचे पात्र गेले दोन ते तीन दिवस झाले कोरडे पडले आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या उन्हाचा तडाका वाढल्याने पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांनाही शेतीसाठी पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. मात्र नदीपात्र कोरडे पडल्याने नागरिकांची तसेच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Dudhganga river)
पाण्यासाठी नागरिकांना विहिरी, बोअरवेल, कुपनलिका आदींवर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतीसाठी ही पाण्याची गरज वाढली आहे. एरवी पंधरा ते वीस दिवसांनी द्यावे लागणारे पाणी आता आठ ते दहा दिवसात द्यावे लागत आहे. गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी वळीव पावसाने हजेरी लावली, मात्र दत्तवाड परिसरात वळीव पावसाने हुलकावणी दिली. भागातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी महागडे खत घालून उसाच्या भरणी केल्या आहेत.
त्यामुळे पाण्याची गरज असतानाच नदीपात्र कोरडे पडल्याने या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी खोडवा ऊस काढल्यानंतर उडीद, शाळू, भाजीपाला आदी पिके केली आहेत. पाण्याअभावी अशी पिके वाळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने त्वरित दूधगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे.
दूधगंगा नदीवरील दत्तवाड-मलिकवाड व दत्तवाड - एकसंबा या बंधाऱ्यावरील बर्गे जीर्ण झाले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यातील बर्गे संबंधित विभागाने त्वरित बदलून घ्यावेत जेणेकरून नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी साठवून ठेवणे सोयीचे होईल व अधिक काळ वापरता येईल. जीर्ण बर्ग्यामुळे आलेल्या पाण्यातील थोडेच पाणी साठवले जाते. उर्वरित पाणी तसेच पुढे निघून जाऊन कर्नाटकात जाणाऱ्या कृष्णा नदीत जाऊन मिळते.