

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरील कंत्राटी कर्मचाऱ्यास ड्रग्ज तस्करीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. शनिवारी सकाळी दिल्ली येथील पैलवानाने सोबत आणलेले चरस डस्टबिनमध्ये टाकले होते. ते विक्रीची जबाबदारी सोपवलेल्या ओंकार अर्जुन मिठारी (वय २७, रा. गणेश कॉलनी, उचगाव) या विमानतळावरील कंत्राटी कर्मचाऱ्याला अटक केली. त्याच्याकडून ७१ ग्रॅम चरस, दुचाकी असा सुमारे १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना उचगाव- गडमुडशिंगी रोडवर चरस विक्रीसाठी एक तरुण येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने रविवारी रात्री सापळा रचून ओमकार मिठारीला ताब्यात घेतले. ओमकार विमानतळावर कंत्राटी पद्धतीने बेल्ट ऑपरेटर म्हणून नोकरीस असून शनिवारी सकाळी चेकिंग काँटरच्या नजीक डस्टबीनमध्ये हा चरस मिळाल्याची कबूली दिली. त्याच्या चौकशीतून मयूर माने याचे नाव निष्पण्ण झाल्याने त्यालाही ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, गोकुळ शिरगावचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार संतोष बरगे, सत्यजित तानुगडे, शिवानंद मठपती, विशाल खराडे यांनी ही कारवाई केली.
दिल्ली कनेक्शन
दिल्ली येथील एक पैलवान महिन्याभरापासून कोल्हापुरात वास्तव्यास होता. त्यानेच हे चरस विमानतळावर फेकल्याची चर्चा समोर आली आहे. हा पैलवान शनिवारी (दि. ११) सकाळी ९ वाजताच्या विमानाने मुंबई आणि तेथून दिल्लीला गेल्याचे उघड झाले आहे. त्याचा शोध सुरू असून, लवकरच त्याची चौकशी करण्यात येणार आहे. ओमकार उच्चशिक्षित असून त्याच्या मोबाईलमधून अनेक बाबींचा उलगडा होणार आहे.