

दिलीप भिसे
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात कोकेन, चरस, गांजा, मेफेड्रॉनची खुलेआम होणारी तस्करी तरुणाईच्या मुळावर उठू लागली आहे. साधारणत: 17 ते 22 वयोगटातील कोवळी पोरं अमली पदार्थांच्या व्यसनांचे शिकार ठरत आहेत. उपनगरांसह ग्रामीण भागातही याचे वाढते प्रमाण समाजाची चिंता वाढविणारे आहे. परिणामी, नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाईकडून गुन्हेगारीचा टक्का वाढू लागला आहे. झटपट आणि विनासायास कमाई देणार्या तस्करीत परप्रांतीय टोळ्यांसह स्थानिक तरुणही सक्रिय आहेत. व्हाईट कॉलर टोळ्यांच्या आश्रयातून शहर, जिल्ह्यात ड्रग्ज तस्करीचा फंडा फोफावू लागला आहे.
डिसेंबर 2024 मध्ये एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोन कॉलेज तरुणांना अटक केली. त्याच्याकडून ड्रग्जसाठा हस्तगत करण्यात आला. चौकशीत नायजेरियन कनेक्शन चव्हाट्यावर आले. जेरबंद झालेल्या तरुणांनी गोव्यात वास्तव्य केलेल्या नायजेरियन तस्कराकडून ड्रग्ज खरेदी केल्याचे निष्पन्न झाले होते. वास्तविक, ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शनचे धागेदोरे कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलेले असतानाही तपास पुढे सरकलाच नाही. गोव्यातील ड्रग्ज तस्करीचा भांडाफोड करण्याची कोल्हापूर पोलिसांची संधी हुकलीच. आज हेच आंतरराष्ट्रीय तस्कर पुन्हा कोल्हापूरसह जिल्ह्यात शिरजोर होऊ लागले आहेत. आठवड्यापूर्वी कोल्हापुरातील गंजी गल्ली चौकात चरस, तर कोरोचीत 7 लाखांचे एमडी ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले. पंटर सापडले; पण तस्करीतल्या बड्या म्होरक्यांचे काय, हा प्रश्न आहे.
अमली पदार्थांची तस्करी करणार्या सराईत टोळ्यांनी अलीकडच्या काळात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. नशिल्या गोळ्यांसह उत्तेजक इंजेक्शन्स, चरस, अफू, एमडी ड्रग्ज सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहेत.
शहापूर पोलिसांनी कोरोची (ता. हातकणंगले) येथील सॉफ्टवेअर इंजिनिअरला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 7 लाखांचे ड्रग्ज हस्तगत केले. शहरासह ग्रामीण भागातही अमली पदार्थांच्या तस्करीचे लोणं फोफावत आहे. कोल्हापूरसह इचलकरंजी, शहापूर परिसर अमली पदार्थ तस्करीतील उलाढालीचे सेंटर बनत चालले आहे.