

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेषकरून महामार्गावर मेफेड्रोन, कोकेन, चरस, अफिमसह गांजाची होणारी मुबलक तस्करी 17 ते 20 वयोगटातील पोरांच्या मुळावर उठू लागली आहे. उच्च शिक्षित तरुण व्यसनाला बळी पडू लागले आहेत. महामार्गावरील काही हॉटेल्स आणि रात्र-दिवस खुलेआम चालणारे कॅफेही व्यसनाचे अड्डे बनू लागले आहेत. नशेच्या सौदागारांनी कॉलेज तरुणांना टार्गेट करून तस्करीतील उलाढालीचा पसारा वाढविल्याचे चित्र आहे. ‘अमली पदार्थांची नशा... होई आयुष्याची दशा...’ असेच काहीसे विदारक आणि चिंतादायक चित्र आहे.
वरकमाईला सोकावलेल्या व्हाईट कॉलरसह स्थानिक गुंडांचा तस्करीतील उलाढालीत सहभाग वाढल्याने परप्रांतीय टोळ्यांनी कोल्हापूरसह परिसराला टार्गेट बनविले आहे. दीड- दोन वर्षांपूर्वी सांगलीतील कुपवाड व कवठेमहांकाळ तालुक्यात छापेमारी करून विशेष पथकाने टोळ्यांचा पर्दाफाश केला होता. या टोळ्यांचेही कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागातील कनेक्शन चर्चेत होते. मात्र, तपास यंत्रणांनी व्याप्ती वाढविली असती, तर तस्करीत गुरफटलेल्या स्थानिक टोळ्यांचे रॅकेट पोलिसांच्या हाताला लागले असते.
अलीकडच्या काळात कर्नाटक, गुजरात, राजस्थानसह मुंबई, पुण्यातील अमली पदार्थ तस्करांचा कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वावर वाढला आहे. पुणे जिल्ह्यातील सराईत तस्कराला सप्टेंबर 2024 मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले. त्याच्या कब्जातून 15 लाख 50 हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले होते; पण नंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे तस्करांचे कारनामे सुरूच आहेत.
मूळचा गुजरातचा; पण सध्या उचगाव येथील मणेर मळा परिसरात वास्तव्य असलेला तस्कर धनराज हमीराराम चौधरी यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद करून दीड लाख रुपये किमतीचे अफिम हस्तगत केले. परप्रांतीय तस्कराचा पुणे-बंगळूर महामार्गासह कोल्हापूर, इचलकरंजी शहरातील खुलेआम वावर धोकादायक ठरत आहे.
शहरासह जिल्ह्यात नशेच्या गोळ्यांना (बटण) मोठी मागणी दिसून येते. कर्नाटक व राजस्थान, तसेच गुजरातमधील काही नामचिन टोळ्यांचा शहरासह जिल्ह्यात सतत संपर्क असतो. साधारणत:, बाराशे रुपये मूल्य असलेल्या पाकिटात 12 ते 15 गोळ्या (बटण) उपलब्ध होतात. नशेच्या एका गोळीचा दोन ते तीन दिवस परिणाम जाणवतो. नशेची गोळी मिळाली नाही तर तरुण नशेच्या धुंदीत कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांचे स्वत:वरचे नियंत्रण सुटू शकते. नशेची गोळी उपलब्ध करण्यासाठी आटापिटा सुरू असतो. प्रसंगी 70 रुपयांच्या बटणाला हजार रुपये मोजून नशेची तलफ भागविली जाते. 18 ते 25 वयोगटातील हे प्रमाण धक्कादायक असल्याचे समजण्यात येत आहे.