

कोल्हापूर : नशिल्या इंजेक्शनची तस्करी करणार्या कळंबा (ता.करवीर) येथील जिम ट्रेनरला शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी अटक केले. ऋषभ रवींद्र आडके (वय 25, रा. नरसिंह कॉलनी, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. संशयिताकडून 66 हजार 740 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
संशयित आडके याची कळंबा येथे जिम आहे. नशिली इंजेक्शन विक्री करण्यासाठी तो शाहूपुरी येथील एका हायस्कूल परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सापळा रचला. हवालदार भैरू माने, मिलिंद बांगर, बाबासाहेब गायकवाड आदींनी संशयिताला मोपेडसह ताब्यात घेतले. झडतीत इंजेक्शनच्या 10 मिलीच्या 50 सिलबंद बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. इंजेक्शनची ऑनलाईन खरेदी केल्याची त्याने पोलिसांना माहिती दिली. आजपर्यंत किती तरुणांना इंजेक्शनची विक्री करण्यात आली, याची संशयिताकडे चौकशी करण्यात येत आहे, असे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.