

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेले प्रभाग रचनेचे प्रारूप शुक्रवारी (दि. 8) जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सादर केले जाणार आहे. जिल्हाधिकारी हे प्रारूप तपासून चार ते पाच दिवसांत नगरविकास विभागाकडे पाठविणार आहेत. 3 सप्टेंबरला प्रारूप, तर 9 ऑक्टोबरला अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार 7 ऑगस्टला प्रभाग रचनेचे प्रारूप अंतिम करून महापालिकेने ते जिल्हाधिकार्यांकडे पाठवायचे होते. परंतु, गुरुवारी ते अंतिम करण्यात आले. शुक्रवारी ते जिल्हाधिकारी येडगे यांच्याकडे पाठविले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर 8 ते 12 ऑगस्टपर्यंत ही प्रभागरचना जिल्हाधिकार्यांकडून नगरविकास विभागाला पाठविली जाईल. नगरविकास विभागाकडून हे प्रारूप 13 ते 25 ऑगस्ट या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाला पाठवायचे आहे. 3 सप्टेंबरला प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती आणि सूचना मागवायच्या आहेत. 9 ऑक्टोबरला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार आहे.
शहरात यापूर्वी 81 प्रभाग होते. एक सदस्यीय पद्धतीने या एका प्रभागातून 81 नगरसेवक निवडले जात होते. यंदा प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असल्याने एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात 20 प्रभाग होणार आहेत. 19 प्रभागांत प्रत्येकी चार ते एका प्रभागात 5 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. प्रभागांची संख्या 81 वरून 20 इतकी होणार असली, तरी त्याचे स्वरूप हे व्यापक राहणार आहे. एका प्रभागाची मतदारसंख्या 25 ते 30 हजार इतकी होण्याची शक्यता आहे.