

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे 68 आणि पंचायत समितीचे 136 प्रारूप मतदारसंघ सोमवारी (दि. 14) जाहीर होणार आहेत. करवीर आणि कागल तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी प्रत्येकी एक तर पंचायत समितीसाठी प्रत्येकी दोन मतदारसंघ वाढणार आहे. यामुळे करवीर, कागलसह आजरा, चंदगड, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील मतदारसंघात फेरबदल होणार आहेत. उर्वरित चार तालुक्यांत मतदारसंघाची रचना पूर्वीप्रमाणेच राहील, अशी शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या मतदारसंघासाठी (गट) आणि पंचायत समितीच्या मतदारसंघासाठी (गण) जिल्ह्याच्या 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या विचारात घेऊन सदस्य संख्या निश्चित करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 67 वरून पुन्हा 68 तर पंचायत समितीची सदस्य संख्या 134 वरून 136 इतकी होणार आहे. हे मतदारसंघ निश्चित करण्यासाठी काही दिवसांपासून प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार मतदारसंघाची प्रारूप रचना निश्चित करण्यात आली आहे. सोमवारी ती जाहीर केली जाणार आहे.
कागल आणि करवीर तालुक्यात दोन्ही मतदारसंघाची संख्या वाढणार आहे. यापूर्वी कागल तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच तर पंचायत समितीचे दहा मतदारसंघ होते, आता जिल्हा परिषदेसाठी सहा तर पंचायत समितीसाठी 12 मतदारसंघ होणार आहेत. करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 11 तर पंचायत समितीचे 22 मतदार संघ होते, ते आता नव्या रचनेत जिल्हा परिषदेचे 12 तर पंचायत समितीचे 24 मतदारसंघ होणार आहेत. आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन आणि पंचायत समितीचे सहा मतदारसंघ होते. नव्या रचनेत आजर्यातील एक मतदारसंघ कमी होणार असून जिल्हा परिषदेचे आता दोन मतदारसंघ होतील, तर पंचायत समितीचे चार मतदारसंघ असतील.
करवीर आणि कागल तालुक्यात मतदारसंघात वाढ होणार आहे. यामुळे या तालुक्यातील मतदारसंघाच्या यापूर्वीच्या रचनेत बदल होणार आहे. यामुळे नवा मतदारसंघ कोणते यासह आपण कोणत्या मतदारसंघात याबाबतही नागरिकांत उत्सुकता आहे. जिल्ह्यात 2017 नंतर हुपरी आणि शिरोळ या दोन नगरपालिका तर आजरा, चंदगड आणि हातकणंगले या नगरपंचायती नव्याने अस्तित्वात आल्या. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातून ही शहरे वगळण्यात आली आहेत. परिणामी या तालुक्यांतील पूर्वीच्या मतदारसंघाचा विचार करता बदल होणार आहे. उर्वरीत चार चालुक्यात पूर्वीप्रमाणेच मतदारसंघ राहतील अशीच शक्यता आहे.
प्रारूप मतदारसंघांवर 14 जुलैपासून हरकत दाखल करता येणार आहे. या हरकती अथवा सूचना जिल्हाधिकार्यांकडे सादर कराव्या लागणार आहेत. 21 जुलैपर्यंत या हरकती सादर करता येणार आहेत. हरकत दाखल करण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी वगळून सहा दिवसांचा कालावधी मिळणार आहे.