Dr. D. Y. Patil : एक द्रष्टा ‘शिक्षणयोगी’

Dr. D.Y. Patil
Dr. D.Y. Patil
Published on
Updated on

डॉ. विश्वनाथ दा. कराड,

संस्थापक, अध्यक्ष, माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे

एक ज्येष्ठ व द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दुःखद निधनाची बातमी मनाला अत्यंत चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर संपूर्ण भारतातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील एका बहुआयामी, दूरदर्शी, संवेदनशील आणि दीपस्तंभासारख्या व्यक्तिमत्त्वाचा एक अध्याय काळाच्या पडद्याआड झाला, असं वाटतं.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने एमआयटी संस्थेचा एक हितचिंतक व मोठ्या भावासमान असणारा मार्गदर्शक लोप पावला आहे. अशा या क्लेशदायीप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. १९८० च्या दशकात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. वसंतदादा पाटील यांच्या खासगी विनाअनुदानित शिक्षण देणार्‍या संस्थांना परवानगी देण्याचा क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णय झाला. त्या पहिल्या काही निवडक संस्थांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि आमची एमआयटी या संस्थांचा समावेश होता. त्यावेळी श्री. वसंतदादा पाटील व डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासमेत आम्ही कर्नाटकातील मणिपाल विद्यापीठाला भेट दिली होती. येथील वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाचे वेगळेपण आणि महत्त्व पाहून महाराष्ट्रातही अशाच संस्था उभारण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.

गेली तीन-चार दशके माझे आणि डी. वाय. पाटील यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध होते. एक द्रष्टा, संवेदनशील व बंधुतुल्य स्नेही म्हणून मी त्यांच्याकडे बघितले. काळागणिक एमआयटीची आणि डी. वाय. पाटील शिक्षण समूहाची प्रगती झाली, तसे आमचे संबंध अधिकाधिक दृढ होत गेले. संस्थेच्या अनेक समारंभांत डॉ. डी. वाय. पाटील आवर्जून उपस्थित राहिले आणि वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. आमच्या संस्थेचे ते एक आधारस्तंभच होते. डॉ. डी. वाय. पाटील यांनी त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून बहुजन समाजातील हजारो-लाखो विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यावसायिक शिक्षण देऊन स्वावलंबी बनवले, हे त्यांचे महाराष्ट्रावरील न फिटणारे ऋण आहे.

दादा, अर्थात डॉ. पाटील, हे अनेक संकटांमध्ये एमआयटीच्या संस्थेमागे अत्यंत निर्धाराने उभे राहिले, आम्हाला प्रोत्साहन दिले; मग ते इंद्रायणी नदीवरील घाट बांधणे असो वा तीर्थक्षेत्राचे ज्ञानतीर्थक्षेत्रात परावर्तित करण्याचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रम असो, दादांनी मोठ्या भावाच्या हक्काने माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. जेव्हा जेव्हा माझ्या उपक्रमांवर टीका-टिप्पणी झाली, तेव्हा दादांनी स्वतः आस्थेने संवाद साधून मला धीर दिला आणि पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, ही गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही.

दादांनी कोल्हापूरचे महापौरपद, आमदारपद व पुढे बिहार आणि त्रिपुराचे राज्यपालपद भूषवून आपल्या प्रशासकीय आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा ठसा उमटवला. लोकांची जाण असणारे एक दूरदर्शी व्यक्तिमत्त्व, अशी डॉ. पाटील यांची ओळख होती. डॉ. पाटील हे निष्ठावान वारकरी होते. त्यांनी अनेकदा त्यांच्या वडिलांसोबत पंढरीची वारी केल्याचे त्यांनी मला सांगितल्याचे आठवते. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला दादांचा येणारा शुभेच्छांचा फोन आता येणार नाही, या विचाराने मन गहिवरते आणि अतिशय व्यथित मनाने मी माझे ज्येष्ठ बंधुतुल्य मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने शिक्षणयोगी असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व त्यांच्या आत्म्यास सद्‌गती लाभो, अशी माऊलीचरणी प्रार्थना करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news