शिक्षणाच्या व्हिजनरी डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांना भक्कम पाठिंबा द्या : आ. डॉ. विनय कोरे

महायुतीचे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित, आधुनिकेतची कास धरणारे
वारणानगर : येथे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे  उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जाहीर मेळाव्यात विजयाची खूण करताना आ. डॉ. विनय कोरे, आ. अशोकराव माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, उपमहापौर अक्षय जरग, अभयकुमार साळुंखे, विजयसिंह माने, एच. आर. जाधव आदी.
वारणानगर : येथे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जाहीर मेळाव्यात विजयाची खूण करताना आ. डॉ. विनय कोरे, आ. अशोकराव माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, उपमहापौर अक्षय जरग, अभयकुमार साळुंखे, विजयसिंह माने, एच. आर. जाधव आदी. (छाया : अरुण कुंभार, वारणानगर)
Published on: 
Updated on: 

वारणानगर : कर्मवीर भाऊराव पाटील आणि बापूजी साळुंखे या शिक्षणमहर्षींनी महाराष्ट्राला शिक्षित करण्याचे काम केले; मात्र पेपरफुटी व अन्य कारणाने शिक्षणाचा बाजार झाला आहे. त्यामुळे शिक्षणाच्या बदलणाऱ्या स्वरूपाला पायबंद घालण्यासाठी आणि गोरगरीब मुलांना आधार देण्यासाठी शिक्षणाच्या व्हिजनरी डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना भक्कम पाठिंबा द्या, असे आवाहन जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी आयोजित जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जाहीर मेळाव्यात आ. कोरे बोलत होते. आ. कोरे म्हणाले, समाजाला शिक्षित करून सामर्थ्यवान बनविणारी व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी गोरगरीब समाजाला शिक्षित केले तरच देशाची प्रगती होते. यासाठी प्रतिनिधित्व करणारे उच्चशिक्षित, आधुनिकेतची कास धरणारे महायुतीचे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीक्रमाने विजयी करा. शिक्षण हा लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा पाया आहे. त्यामुळे त्याचे प्रतिनिधित्व करणारे महायुतीचे शिक्षणाचे बाळकडू मिळालेले सक्षम उमेदवार विधान परिषदेत पाठवून शिक्षकांचा आवाज बनवा.

आ. अशोकराव माने म्हणाले, डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांना पाच जिल्ह्यांतून मतदारांची साथ मिळत आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी अहोरात्र प्रयत्न करावेत. जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम म्हणाले, शिक्षणाचे बाळकडू ज्यांच्या पिढ्यान्‌पिढ्या रक्तात आहे, त्यांना शिक्षणाचे प्रश्न अधिक सजगतेने सोडविता येतील. त्यांना शिक्षकांचा आवाज बनवा. डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी ताकद पणाला लावावी. भैया माने यांनी माघार घेण्यात आमदार कोरे यांनी भूमिका घेतल्याचे सांगून भैया माने व विजयसिंह माने या दोघांचा योग्य वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सन्मान करतील, असेही त्यांनी सांगितले.

स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे म्हणाले, बापूजी साळुंखे, डॉ. डी. वाय. पाटील आणि या दोन्ही शिक्षण संस्थांच्या माध्यमांतून शिक्षण व ज्ञान ज्ञानाचे काम सुरू आहे. पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कौस्तुभ गावडे, डॉ. स्मिता जाधव यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. दैनिक ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील व डी. वाय. पी. आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत खाडे यांनी, महिला सक्षमीकरणाचे मोठे काम डॉ. स्मिता जाधव यांनी हाती घेतले आहे. पदवीधर व शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांना विजयी करावे, असे आवाहन केले.

यावेळी माजी शिक्षक नेते दादासाहेब लाड, राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष बाबा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे, डी. एस. घोगरे, राजेंद्र माने, विजयकुमार माने आदींनी शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणावे, असे आवाहन केले.

करण सरनोबत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. नामदेव चोपडे यांनी उमेदवारांची ओळख करून दिली. याप्रसंगी कोल्हापूरचे उपमहापौर अक्षय जरग, माजी आमदार भगवानराव साळोखे, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, वारणा दूध संघाचे अध्यक्ष एच. आर. जाधव, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, वारणा शिक्षण मंडळाचे सीईओ डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, एबीपी शिक्षण समूहाचे संस्थापक ए. बी. पाटील, भाजपचे निरीक्षक वैकुंठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य स्नेहल वेल्हाळ, राहुल पोवार आदींसह पदवीधर, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नामदेव चोपडे यांनी केले. श्रीकांत पाटील यांनी आभार मानले.

जुनी पेन्शनची जबाबदारी माझी : आ. कोरे

उच्चशिक्षित डॉ. स्मिता जाधव यांची उमेदवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निश्चित करण्याच्या बैठकीत मी, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (पुणे) कुलपती डॉ. पी. डी. पाटील व समीत कदम होतो. त्यावेळी शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्यांची जुनी पेन्शनची मागणी मान्य केली पाहिजे, असा आग्रह धरला. तो मान्य केला. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्र्यांकडे आम्ही पाठपुरावा करून जुनी पेन्शन लागू करण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचे डॉ. कोरे यांनी जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news