

कोल्हापूर : गेल्या 21 वर्षांपासून कोल्हापुरात ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने दै. ‘पुढारी’ आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेतील यंदाचे 22 वे व्याख्यान मंगळवारी (दि. 1) होणार आहे. ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने ‘डोळे आणि आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.
हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे सायंकाळी सव्वापाच वाजता होणार आहे. यावेळी कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, दैनिक ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गेली दोन दशके डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाचे नाते द़ृढ करणारी ही व्याख्यानमाला कोल्हापूरकरांसाठी ‘आरोग्य संजीवनी’ ठरली आहे. यंदाही या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज आहेत. आजच्या धावपळीच्या युगात बदलती जीवनशैली, वाढलेला स्क्रीन टाईम आणि ताणतणावांमुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मधुमेह, उच्च रक्तदाब याचा डोळ्यांवर होणारा परिणाम, यामुळे डोळ्यांचे आरोग्य टिकवणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याचे मार्गदर्शन डॉ. लहाने करणार आहेत. यापूर्वी महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी व्याख्यानमालेत व्याख्याने दिली आहेत. व्याख्यानमालेसाठी प्रवेश अग्रक्रमानुसार देण्यात येणार आहेत. श्रोत्यांनी वेळेवर उपस्थित राहावे आणि व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यातील माकेगाव या छोट्याशा गावातून येऊन लाखो रुग्णांच्या जीवनात प्रकाश पेरणार्या डॉ. तात्याराव लहाने यांनी मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांची एक चळवळच महाराष्ट्रात उभी केली आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेल्या तात्याराव यांनी कमवा आणि शिका योजनेतून आपले शिक्षण पूर्ण केले. धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीत असताना त्यांचा किडनीचा आजार बळावला. 1994 मध्ये त्यांच्या आईने त्यांना किडनी दिली. त्यामुळे त्यांना जीवनदान मिळाले. आईच्या या दातृत्वाने त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी पुढील आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेतले. त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘पद्मश्री’ किताबानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे कार्य आणि संघर्षमय अनुभव ऐकण्याची संधी कोल्हापूरकरांना यानिमित्ताने मिळणार आहे. त्यांच्या जीवन चरित्रावर ‘डॉ. तात्या लहाने अंगार पॉवर इज विदीन’ हा चित्रपट तयार करण्यात आला. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय असून, त्यांची संघर्षमय कहाणी त्यात मांडली आहे.