

वारणानगर : येथील वारणा महिला समूहाच्या माजी अध्यक्षा शोभाताई कोरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त सांगलीच्या ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांना शोभाताई कोरे राज्यस्तरीय महिला जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, वारणा महिला शक्तीच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांनी दिली.
तसेच वारणा सहकारी साखर कारखान्याच्या नर्सरी विभागाच्या वतीने ‘वनशोभाश्री’ पुरस्कार शेडशाळ येथील डॉ. आप्पासाहेब पाटील महिला देशी वाण संरक्षण व संवर्धन बीज बॅंकेच्या अध्यक्षा शामशादबी इब्राहिम पठाण यांना दिला जाणार आहे. सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या वतीने ९ ते १२ ऑक्टोबरदरम्यान दिव्य शोभाई जागर स्त्री शक्तीचा या स्मृती पर्वात महिला व मुलींसाठी विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, महिला जीवन गौरव पुरस्कार दिले जाणार आहेत. सोमवार दि. १२ रोजी दुपारी ४ वाजता पुरस्कार वितरण होणार आहे.