

कोल्हापूर : कुलपती तथा राज्यपाल कार्यालयाकडून अखेर चौथ्या दिवशी शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची निवड केली. शनिवारी (दि. 11) सकाळी कुलगुरू डॉ. गोसावी प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
डॉ. गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपदी 6 जून 2023 मध्ये नियुक्ती झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक व पर्यावरणशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. डॉ. गोसावी यांचे प्राथमिक शिक्षण धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे झाले. यावल तालुक्यातील किनगाव येथून त्यांनी दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी जळगावातील एम.जे. महाविद्यालयातून अकरावी, बारावी सायन्स पूर्ण केले. नूतन मराठा महाविद्यालयातून त्यांनी बी.एसस्सी. इलेक्ट्रॉनिक्स विषयातून पदवी पूर्ण केली. त्यानंतर पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले. याच विद्यापीठात प्राध्यापक ते कुलगुरूपदापर्यंत झेप घेतली. त्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्याची दखल घेऊन राज्यपालांनी शिवाजी विद्यापीठाचा प्रभारी कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. यासंदर्भातील पत्र राज्यपाल कार्यालयाकडून शिवाजी विद्यापीठ प्रशासनास शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले आहे.