

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुले छोट्या शहरांमधून पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जातात आणि तिथे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत राहून अभ्यास करतात. या तरुणांना त्यांच्या गावाच्या ठिकाणीच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन उपलब्ध झाल्यास त्यांचे हे स्थलांतर पूर्णपणे थांबवता येईल. यासाठी प्रत्येक तालुक्यात मार्गदर्शन केंद्र सुरू करणे हा आपल्या संकल्पाचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी केले. कोल्हापूर दौऱ्यादरम्यान शिक्षक, पदवीधर आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
यावेळी आपले व्हिजन आणि १५ मुद्द्यांचा सर्वसमावेशक संकल्प मांडताना डॉ. जाधव म्हणाल्या, मतदारसंघातील सर्व ५८ तालुक्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स उभारली जातील. प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक उद्योगांच्या गरजेनुसार मनुष्यबळनिर्मिती केली जाईल. यामध्ये सांगलीत हळद, द्राक्ष किंवा कृषी प्रक्रिया उद्योगाशी संबंधित कौशल्ये, तर सोलापूरमध्ये वस्त्रोद्योगाशी संबंधित कौशल्यांवर भर दिला जाईल. याशिवाय बँकिंग क्षेत्रातही नवनवीन करिअरच्या संधी उपलब्ध होत असल्याने त्या कौशल्यांचाही यात समावेश असेल.
महिला सक्षमीकरणावर भर देताना त्या म्हणाल्या, शहरांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित ‘वर्किंग वूमेन्स हॉस्टेल्स’ उभारणे, ‘वर्क फ्रॉम होम’साठी आवश्यक कौशल्ये उपलब्ध करून देणे आणि मातृत्वामुळे खंडित झालेल्या रोजगाराच्या संधी पदवीधर महिलांना पुन्हा मिळवून देण्यासाठी ठोस पाठबळ दिले जाईल.
डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले की, तरुणांना एआय, डेटा ॲनालिटिक्स व रोबोटिक्सचे शिक्षण देऊन रोजगाराभिमुख करणे, मानधनासह इंटर्नशिप-अप्रेंटिसशिप देणे, ग्रामीण भागात डिजिटल अभ्यासिका, करिअर मार्गदर्शन आणि रोजगार मेळावे आयोजित केले जातील. परदेशी शिक्षण व रोजगारासाठी प्रत्येक तालुक्यात विशेष कक्ष, यूपीएससी व एमपीएससीसाठी डिजिटल लायब्ररी आणि नवउद्योजकांना स्टार्टअपसाठी मार्गदर्शन करण्यात येईल.
पश्चिम महाराष्ट्रातील ५८ मतदारसंघांत ‘महात्मा फुले इन्क्युबेशन सेंटर्स’, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचा विस्तार, तरुणांसाठी ताणतणाव मुक्ती समुपदेशन केंद्र, व्यसनमुक्ती अभियान आणि मतदारांशी सतत संवादासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही देत त्यांनी मतदारांना महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.