

चंदगड : राज्याच्या विकासासाठी महायुती सक्षम असून हा महायुतीचा धर्म म्हणून चंदगड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट व सहकारी पक्ष एकत्रितपणे येऊन पुणे पदवीधर निवडणुकीत डॉ. स्मिता योगेश जाधव व पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना मताधिक्य देऊ, असा निर्धार भाजपचे आमदार शिवाजी पाटील व राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील यांनी इनाम सावर्डे (ता. चंदगड) येथील मेळाव्यात केला. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील होते. मेळाव्यास तीनही तालुक्यांतून उदंड प्रतिसाद मिळाला.
माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, दैनिक 'पुढारी' वृत्तपत्राच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांची कोंडी फुटली आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारे घराणे म्हणून नावलौकिक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय नेत्याला डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे मार्गदर्शन आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळून डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांना मताधिक्य देणार आहे.
माजी मंत्री भरमूअण्णा पाटील म्हणाले, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील ताकदवान आमदार आहेत. महायुती सरकारमुळे जिल्ह्याचा विकास गतीने होत आहे. या विकासात कोल्हापूरचे आणखी दोन आमदार विजयी झाले, तर आणखी गती येईल. दोन्ही उमेदवारांना विजयी करूया.
व्यासपीठावर चंदगड तालुका पंचायत समिती सभापती प्रा. विलास नाईक, ठाणे येथील भाजपचे नेते व निवडणूक प्रभारी सचिन पाटील, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी, जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावडे, शारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जे. बी. पाटील, तालुका पंचायत समिती सत्ताधारी गटनेते पांडुरंग बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर, चंदगड तालुका संघाचे उपाध्यक्ष तानाजी गडकरी, चंदगडचे नगराध्यक्ष सुनील काणेकर, प्रा. ॲड. एन. एस. पाटील, खेडूत शिक्षण संस्थेचे सचिव एम. एम. तुपारे, अनिकेत चराटी होते. यावेळी दैनिक 'पुढारी'चे विभागीय प्रतिनिधी प्रवीण आजगेकर, प्रा. सुखदेव शहापूरकर, एस. एल. पाटील, ब्रह्मानंद पाटील, एल. के. पाटील, भाजपचे चंदगड मंडल अध्यक्ष विशाल बल्लाळ, माणगाव मंडळ अध्यक्ष दिग्विजय देसाई यांची भाषणे झाली.
डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांना विजयी करून विकासाला बळ देऊया
आ. शिवाजी पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान असणारे दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव हे निस्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे. डॉ. जाधव यांचे जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी स्नेहसंबंध आहेत, तसेच स्नेहसंबंध कौस्तुभ गावडे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहेत. डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांना विजयी करून चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला बळ देऊया.