

‘पुढारी’चे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्याला उपस्थित राहून रूपेरी पडद्यावरील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मुंबई येथून खास विमानाने बुधवारी सकाळी दहा वाजता सिने व नाट्य क्षेत्रांतील अभिनेते, दिग्दर्शक तसेच गायक संगीतकार यांचे आगमन झाले. ‘पुढारी’कार डॉ. जाधव यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळास्थळी सर्व कलाकारांनी अभीष्टचिंतन केले. डॉ. जाधव यांच्या वाढदिनाच्या कार्यक्रमात पडद्यावरील तारे-तारकांच्या उपस्थितीचीही चर्चा रंगली.
ज्येष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेते जयवंत वाडकर, ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर, अभिनेते दिग्दर्शक सुबोध भावे, अभिनेता संदीप पाठक, मिलिंद गवळी, अक्षय मुदवाडकर, शुभंकर एकबोटे, चिन्मय उदगीरकर, गायक मंगेश बोरगावकर, उत्कर्ष शिंदे, गायिका सावनी रवींद्र, संगीतकार नीलेश मोहरीर, अभिनेत्री अमृता बने, अक्षया नाईक, आदिती द्रविड यांनी डॉ. जाधव यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व कलाकारांनी डॉ. जाधव यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. तसेच ‘सिंहायन’ या डॉ. जाधव यांच्या आत्मचरित्राविषयी उत्सुकतेने अनेक गोष्टी जाणून घेतल्या.