

कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक, पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा 80 वा वाढदिवस सहस्रचंद्रदर्शन सोहळा बुधवारी (दि. 5) सकाळी 9.30 वाजता पोलिस परेड ग्राऊंड येथे साजरा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत होणार्या दिमाखदार सोहळ्यासाठी पोलिस यंत्रणेने कमालीची खबरदारी घेतली आहे. समारंभस्थळासह शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येत आहे.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह विविध राज्यांतून मंत्रिगण, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसह उच्चपदस्थ अधिकारी कोल्हापुरात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, गडहिंग्लज विभागाचे अपर पोलिस अधीक्षक आप्पासाहेब जाधव, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी सोमवारी सायंकाळी कसबा बावडा रोडवरील पोलिस परेड ग्राऊंड येथील समारंभस्थळाची पाहणी केली.
दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा 80 वा वाढदिवस सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, पवार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, तसेच राज्य सरकारमधील कॅबिनेट व राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
असा असेल बंदोबस्त
वरिष्ठ अधिकार्यांसह एक हजारावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. यामध्ये अपर पोलिस अधीक्षक-2, पोलिस उपअधीक्षक-5, पोलिस निरीक्षक-25, सहायक, पोलिस उपनिरीक्षक-75, पोलिस कर्मचारी 757, शहर वाहतूक शाखेचे 60 जवान, उजळाईवाडी विमानतळापासून पोलिस मुख्यालय परेड ग्राऊंड मार्गावर 225 पोलिस, जलद कृती दलाच्या तीन तुकड्यांतील 75 जवान असा फौजफाटा नियुक्त करण्यात आला आहे.