कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मंगळवारी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव उपस्थित होते.
कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदाच्या नियुक्तीनंतर रंजनकुमार शर्मा यांनी मंगळवारी सायंकाळी दै. ‘पुढारी’ कार्यालयास भेट दिली. शर्मा यांनी डॉ. जाधव यांच्याशी कोल्हापूरसह परिक्षेत्रांतर्गत नशामुक्त अभियान, कोल्हापूर पोलिस आयुक्तालय, परिक्षेत्रातील परिस्थिती, मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच, खंडपीठ, सीमाभागातील सद्यस्थिती, पोलिसांची भूमिका आदी विषयांवर चर्चा केली. विविध सामाजिक प्रश्नांवर दै. ‘पुढारी’चे योगदान आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने मदत होत असल्याचेही पोलिस महानिरीक्षक शर्मा यांनी सांगितले.
दै. ‘पुढारी’ने आतापर्यंत मांडलेले विविध सामाजिक प्रश्न, सियाचीन येथील सैनिकांसाठीचे हॉस्पिटल, भूज येथील हॉस्पिटल, ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांच्या योगदानाबद्दल शर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या ‘सिंहायन’ या आत्मचरित्राचे अनेक किस्से ‘बहार’ पुरवणीतून वाचल्याचे तसेच त्यातून महाराष्ट्राची जडणघडण डोळ्यांसमोर उभी राहिल्याचे शर्मा यांनी सांगितले.