कोल्हापूर : गोकुळ दूध संघ महाराष्ट्रातील मोठा ब्रॅँड असून, सध्या जुन्या-नव्या संचालकांची चांगली सांगड आहे. येणार्या काळात दूध संकलनाबरोबर इतर उत्पादने वाढविण्यावर संघाने भर द्यावा. ‘गोकुळ’ला गोवा, कर्नाटक राज्यांत विस्तारासाठी मोठी संधी आहे. संघाने याबाबतचे पाऊल उचलून शेतकर्यांचा फायदा करून द्यावा, अशी सूचना दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी संचालक मंडळास केली.
गोकुळ दूध संघाचे नूतन अध्यक्ष नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह संचालकांनी सोमवारी सकाळी दै. ‘पुढारी’च्या मुख्य कार्यालयास भेट दिली. यावेळी दै. ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेतली. यावेळी डॉ. जाधव यांनी नूतन अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गोकुळ दूध संघासह विविध विषयांवर डॉ. जाधव यांनी संचालक मंडळास मार्गदर्शन केले.
डॉ. जाधव म्हणाले, गोकुळ दूध संघाची चांगली प्रगती सुरू असून, त्यात वाढ करून गती देण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न व्हावेत. संघाचा मुंबईसह राज्याच्या विविध भागांत विस्तार करण्याची गरज आहे. इतर दूध संघांतील तज्ज्ञ मंडळींना संघात घेऊन दूध संघ वाढविण्यावर भर द्यावा. नूतन अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघाच्या पुणे व मुंबईत स्व-मालकीच्या इमारती घेऊन विस्तार करण्याचा मानस आहे. आगामी काळात दूध संघाच्या सर्व्हिसेस मोबाईल अॅपवर सुरू करण्यात येणार आहेत.
संचालक अजित नरके म्हणाले, ‘गोकुळ’चे दूध संकलन 12 लाखांवरून 18 लाखांपर्यंत पोहोचले असून, यात सातत्य ठेवले जात आहे. 25 टक्के कलेक्शन हे सोलापूर, रायबागसह कर्नाटक परिसरातून होते. यावेळी बाबासाहेब चौगुले, किसन चौगुले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, रणजितसिंह पाटील, ‘गोकुळ’चे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील आदी उपस्थित होते.
गोवा राज्यात पर्यटकांची संख्या मोठी असून, तेथे हॉटेलसाठी दुधासह इतर उत्पादनांना मागणी जास्त असल्याचे डॉ. जाधव यांनी संचालक मंडळास सांगितले. संचालक अजित नरके यांनी गोवा सरकारसमवेत करार करून तेथे ‘गोकुळ’चे दूध व इतर उत्पादने पोहोचविण्यासाठी आपण सहकार्य करावे, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याकडे केली. यास तत्काळ प्रतिसाद देत डॉ. जाधव यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमवेत बोलतो, अशी ग्वाही संचालकांना दिली.