कोल्हापूर : शहर, ग्रामीण भागातील तरुण वकिलांना सर्किट बेंचमधील कामकाजाची तांत्रिकद़ृष्ट्या माहिती व्हावी, यासाठी दै. ‘पुढारी’च्या सहयोगातून प्रशिक्षित आणि अनुभवी वकिलांच्या उपस्थितीत कार्यशाळा आयोजित केल्यास तरुणांना संधी उपलब्ध होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वपक्षीय कृती समितीने दै. ‘पुढारी’च्या पुढाकारातून कार्यशाळा घेण्याची विनंती केली. त्यास दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी कृती समितीच्या विनंतीनुसार कार्यशाळेसाठी पुढाकार घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी 1974 पासून शासन आणि न्याय व्यवस्थेकडे सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शनिवारी सायंकाळी गौरव करण्यात आली. कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, अॅड. बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, अनिल घाटगे, अविनाश दिंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. जाधव यांचे अभिनंदन केले.
आर. के. पवार म्हणाले, जिल्ह्याच्या विकासात डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे योगदान मोलाचे आहे. खंडपीठासाठी पन्नास वर्षांचा लोकलढा केवळ डॉ. जाधव यांच्या प्रेरणेमुळे सुरू आहे. सहा जिल्ह्यांतील लाखो पक्षकारांना डॉ. जाधव यांच्या प्रयत्नामुळे न्याय मिळणार आहे.
अॅड. बाबा इंदूलकर म्हणाले, सर्किट बेंचमुळे शहर, ग्रामीण भागातील तरुण वकिलांना करिअरची संधी मिळणार आहे. त्यांना खंडपीठ, सर्किट बेंचच्या कार्यपद्धतीची माहिती आवश्यक आहे. लॉ कॉलेजमधील प्रशिक्षित, अनुभवी वकिलांकडून तरुणांना मार्गदर्शन झाल्यास त्यांचे करिअर घडू शकते. यासाठी दै. ‘पुढारी’च्या सहयोगातून कार्यशाळा आयोजित केल्यास तरुणांना मार्गदर्शन मिळेल.
डॉ. जाधव म्हणाले, सर्किट बेंचच्या माध्यमातून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील तरुण वकिलांना मोठी संधी मिळाली आहे. सर्किट बेंचमधील कामकाज पद्धतीची तरुणांना माहिती होणे गरजेचे आहे. दै. ‘पुढारी’च्या वतीने कार्यशाळेसाठी पुढाकार घेऊ. लवकरच त्याचे नियोजन केले जाईल. यावेळी झालेल्या चर्चेत दिलीप देसाई, अनिल घाटगे, सोहेल बागवान, सुरेश कुरणे, गणेश जाधव, रियाज कागदे, हिदायत मणेर, अविनाश दिंडे, मुसाभाई कुलकर्णी सहभागी झाले होते.