

कोल्हापूर : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील गुणवंतांचा गौरव करणाऱ्या ‘ब्रँड कोल्हापूर’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि ‘रोड मराठा’कार डॉ. वसंतराव मोरे तसेच ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यदिग्दर्शक डॉ. शरद भुताडिया यांना जाहीर झाला आहे.
बुधवारी (दि. ४) सकाळी १० वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या हस्ते व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होईल. कोल्हापूरच्या अनेक सुपुत्रांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकिक जागतिक स्तरावर पोहोचविला आहे. नव्या पिढीनेही ही परंपरा कायम राखली आहे. या गुणवंतांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ब्रँड कोल्हापूर’ पुरस्कार उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
ब्रँड कोल्हापूर समितीचे सदस्य उदय गायकवाड, प्राचार्य डॉ. महादेव नरके, प्राचार्य अजेय दळवी, चेतन चव्हाण, अनंत खासबारदार, भरत दैनी, डॉ. अमर आडके, अनुराधा कदम, विनायक पाचलग, संग्राम भालकर, ऐश्वर्य मालगावे, डॉ. राजेंद्र रायकर आणि सचिन लोंढे-पाटील यांनी ही माहिती दिली.