Jaisingrao Pawar Shahu Award | डॉ. जयसिंगराव पवार यांच्या संशोधनाला शाहू पुरस्काराने मानवंदना

आनंद अन् दु:ख अशा भावनांचा संगम; पुरस्कार स्वीकारताना वसुधा पवार भावुक
कोल्हापूर : छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. डॉ. जयसिंगराव पवार यांना देण्यात आला. पवार यांच्या वतीने खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना वसुधा जयसिंगराव पवार. यावेळी उपस्थित पालकमंत्री प्रकाश आबिटकर, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. ज्योती जाधव, डॉ. आर. के. कामत, डॉ. विजय राठोड, डॉ. जॅसमिन, गजानन गुरव आदी.
कोल्हापूर : छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. डॉ. जयसिंगराव पवार यांना देण्यात आला. पवार यांच्या वतीने खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना वसुधा जयसिंगराव पवार. यावेळी उपस्थित पालकमंत्री प्रकाश आबिटकर, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. ज्योती जाधव, डॉ. आर. के. कामत, डॉ. विजय राठोड, डॉ. जॅसमिन, गजानन गुरव आदी. (छाया : मिलन मकानदार)
Published on
Updated on

कोल्हापूर : शाहू पुरस्काराच्या गेल्या ४० वर्षांच्या परंपरेत यंदा प्रथमच मरणोत्तर पुरस्कार ज्येष्ठ इतिहासकार कै. डॉ. जयसिंगराव पवार यांना देण्यात आला. शाहू विचारांचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जागर करणाऱ्या डॉ. पवार यांच्या संशोधनाला, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेल्या या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्काराने जणू मानवंदना मिळाली.

शुक्रवारी राजर्षी शाहूंच्या जयंतीदिनी खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार स्वीकारताना डॉ. पवार यांच्या पत्नी वसुधा पवार यांचे डोळे पाणावले. एकीकडे इतिहास संशोधन कार्याचा अभिमान, तर दुसरीकडे डॉ. पवार यांची उणीव, अशा वातावरणात आनंद आणि दु:ख अशा भावनांच्‍या दाटलेल्या संगमात हा हृदयस्पर्शी सोहळा झाला. रोख एक लाख रुपये आणि मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप होते.

खासदार शाहू महाराज म्हणाले, डॉ. पवार यांनी इतिहासातील खरे पैलू संशोधनातून उजेडात आणले म्हणूनच त्यांची ‘कोल्हापूर स्कूल ऑफ हिस्ट्री’ अशी ओळख आहे. त्यांच्या संशोधनामुळे इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला. पालकमंत्री आबिटकर म्हणाले, आपण शाहू महाराजांसारखे घडले पाहिजे ही भावना नव्या पिढीत निर्माण करण्याचे बीज डॉ. पवार यांच्या संशोधनात होते. मरणानंतरही समाजात नाव रुजवण्याची पुण्याई त्‍यांनी मिळवली. त्यांचे संशोधन कार्य अविरत ठेवण्याची नव्या पिढीची जबाबदारी आहे.

इतिहासाचा ध्यास हाच बाबांचा श्वास

शाहू संशोधन केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, इतिहासाचा ध्यास हाच बाबांचा श्वास होता. सत्य इतिहास मांडताना ते खरेपण पचवणाऱ्या समाजनिर्मितीसाठीही त्यांनी काम केले. प्रकृती बिघडल्यानंतर हॉस्पिटलमध्येही ते ऐतिहासिक संदर्भांवरच बोलत, अखेरपर्यंत आईला पुस्तके वाचून दाखवण्याचाच त्यांचा आग्रह होता.

ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अशोक चौसाळकर यांनी आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी मानपत्र वाचन केले. पंडित कंदले यांनी निवेदन केले. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव उपस्थित होते.

पुरस्काराच्या रकमेतून बक्षीस

पुरस्काराच्या रकमेत आणखी भर घालून ती शिवाजी विद्यापीठातील इतिहास विषयातील उत्कृष्ट प्रबंधाला बक्षीस देण्याचे डॉ. मंजुश्री पवार यांनी जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news