

कोल्हापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण व सामरिक अभ्यास विभागाचे (डीडीएसएस) वरिष्ठ प्राध्यापक व विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय खरे हे शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत पुष्प गुंफणार आहेत. ‘अमेरिका-इराण युद्ध : सद्य:स्थिती आणि जागतिक परिणाम’ या विषयावर बुधवारी (दि. 20) सायंकाळी 5 वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर, गायन समाज देवल क्लब येथे त्यांचे व्याख्यान होणार आहे.
डॉ. खरे यांना 30 वर्षांहून अधिक शैक्षणिक व संशोधन क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पुणे विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. ते सिनेट, विद्या परिषद सदस्य, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे सदस्य, अभ्यास मंडळाचे सदस्य राहिले आहेत. डॉ. खरे यांचे संरक्षण व सामरिक अभ्यास विभागातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा अभ्यासात नवीन पंचवार्षिक एकात्मिक एमए, एमएस्सी अभ्यासक्रम सुरू केला, जो भारतातील पहिलाच प्रयत्न होता. जागतिक शांतता, सुरक्षा व सामरिक अभ्यासात एमए आणि संरक्षण व सामरिक अभ्यासात नऊ विविध पदव्युत्तर पदविका सुरू केल्या आहेत. पुणे विद्यापीठात सप्टेंबर 2012 पासून आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक म्हणून उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणासाठीच्या सर्व आंतरराष्ट्रीय उपक्रमांचे ते नेतृत्व करत आहेत.
डॉ. खरे यांनी ‘भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा समीक्षात्मक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली. ‘भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार’ या शीर्षकाखाली पुस्तकरूपात प्रकाशित केले. कॅनडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशनकडून पहिला आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे.