कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील डॉ. ग. गो. जाधव अध्यासन देशातील परिपूर्ण अत्याधुनिक माध्यम संकुल बनावे, अशी अपेक्षा दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी व्यक्त केली.
विद्यापीठातील डॉ. ग. गो. जाधव अध्यासनामध्ये गुरुवारी दुपारी आढावा बैठक झाली. याप्रसंगी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्यापीठ इंजिनिअरिंग विभागाचे अधिकारी प्रमुख उपस्थित होते. डॉ. जाधव यांनी डॉ. ग. गो. जाधव अध्यासन कामाचा आढावा घेताना अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
विद्यापीठाच्या वतीने सध्या मास कम्युनिकेशन, बीए. फिल्म मेकिंग, पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम, सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेंट्री फोटोग्राफी, सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग हे कोर्स सुरू आहेत. येणारा काळ हा प्रिंट, डिजिटल व चॅनलचा असणार आहे. त्याअनुषंगाने अध्यासनामार्फत टी.व्ही. अँकरिंग व रेडिओ जॉकी यासह विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे पत्रकारितेचे नवीन अद्ययावत कोर्सेस सुरू करावेत. कर्मचारी भरतीसंदर्भात प्रस्ताव उच्चशिक्षण विभागास देण्याचे नियोजन करावे. लवकरात लवकर अध्यासन इमारतीचे बांधकाम पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
विद्यापीठाचे निवृत्त उपकुलसचिव जी. एस. कुलकर्णी यांनी अध्यासन इमारत बांधकामाचा आढावा घेतला. डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले. यावेळी उपकुलसचिव रणजित यादव, आर्किटेक्चर अमर उपाध्ये, निवृत्त उद्यान अधीक्षक चंद्रकांत जितकर, विद्युत अभियंता अमित कांबळे, तांत्रिक सल्लागार अतुल शिरोडकर, काँट्रॅक्टर बापू लाड, ठेकेदार सुनील नागराळे आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा पदाचा कार्यभार 6 ऑक्टोबर रोजी पूर्ण होत आहे. डॉ. ग. गो. जाधव अध्यासन उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष वेळ दिला आहे. त्याबद्दल दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी शिवाजी विद्यापीठ, डॉ. ग. गो. जाधव अध्यासन व ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या वतीने आभार व्यक्त केले.