

लोकसेवेचे विद्यापीठ, सजग समाजकारणी, यशस्वी शिक्षणतज्ज्ञ, व्यासंगी कुलपती, माझे जिवलग डॉ. डी. वाय. पाटील गेले ही भावनाच सर्वांगाला भेदरून टाकते. मोठ्या भावासारखा त्यांचा व माझा जिव्हाळा. लहान असूनही मी त्यांना ‘दादा’ म्हणायचो, हे कधीच त्यांनी स्वीकारले नाही. ‘नलगे सर लगेच या, बोलायचं आहे.’ हे काळजातील शब्द आता ऐकू येणार नाहीत, डी. वाय. दादांचे जवळचे स्नेही कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे ओथंबलेल्या डोळ्यांनी, हुंदका देत बोलत होते.
वडिलांनी केलेल्या संस्कारांनी त्यांना मनोबल दिले. बालवयात साऱ्या घरादाराची, शेतीभातीची जोखीम त्यांच्यावर पडली; पण या प्रतिकूल परिस्थितीत न खचता उभे राहिले. शिक्षणाच्या वाटा गुणवत्तेने यशोमंदिराकडे नेल्या. घराण्यातील भक्तीमार्गी अध्यात्म भाव, समाजनिष्ठा आणि शिक्षणाने आलेली परिपक्वता यांनी मनाची जडण झाली आणि कुस्तीसारख्या मनस्वी छंदाने त्यांच्या शरीराची घडण झाली. त्यांच्या ठायी सर्वसामान्य, गरीब, दुःखित यांच्याविषयी अपार करुणा होती. त्यातूनच अन्यायाच्या विरोधात ऐन तारुण्यात ते उभे राहिले. सातत्याने समाजाच्या भलेपणासाठी कृतिशील बनले. चळवळी उभारल्या.
सामूहिक जीवनाच्या संकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी कशाचीही पर्वा केली नाही. ‘कोल्हापूर शुगर मिल’ हा खासगी मालकीचा साखर कारखाना ‘सहकारी’ बनावा यासाठी ‘सहकार तत्त्वा’चा पहिला उद्घाेष डी. वाय. पाटीलसाहेबांनीच केला. वारणेवरील चांदोली धरणाच्या झालेल्या चळवळीत सक्रिय सामील झाले. काळम्मावाडी धरणाच्या आंदोलनात तर ते अग्रणी होते. सीमा प्रश्नाची चळवळ उभी राहिली तेव्हा विधानसभेत आमदारकीचा राजीनामा देण्याची प्रथम त्यांनीच घोषणा केली. कसबा बावड्याच्या श्रीराम सोसायटीला योग्य दिशा मिळावी, अधिक व्यापक विकास व्हावा म्हणून अल्प वयातच त्यांनी धुरा सांभाळली. समाजातील शिक्षणाची आच त्यांच्या मनाला सतत टोचत होती. त्यांचा पिंड समाजसेवेचा, लोकोद्धाराचा.
राजकारणातील अकरा वर्षे त्यांनी जनसामान्यांच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी वेचली. डोंगराळ, मागास, उपेक्षित, दुर्लक्षित भागाचा विकास हाच त्यांचा ध्यास होता. म्हणूनच त्यांच्या कार्यकर्तृत्वाने भारावलेली निरपेक्ष लोकशक्ती त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्रिपुराचे राज्यपाल असताना एके दिवशी फोन खणाणला. ‘डी. वाय. बोलतोय’. ‘साहेब बोला. कसे आहात? तब्येत कशी आहे?’ ‘तब्येत उत्तम आहे. तुम्ही त्रिपुराला यायचं आहे’. ‘मी आणि कशासाठी?’ ‘आल्यानंतर सांगतो. येताना या वर्षात लिहिलेली सर्व पुस्तके मला वाचायला घेऊन या’. ‘बरं साहेब.’ त्याच दिवशी विमानाचे तिकीट, सर्व व्यवस्था आणि सोबतीला किती माणसं, अशी स्वीय सहायकाकडून विचारणा झाली.
कोल्हापूरच्या विमानतळापासून ते त्रिपुरा राजभवनापर्यंत काळजी घेण्यासाठी लोक दिमतीला होते. त्रिपुरा राज्यात आठ दिवस डॉ. डी. वाय. पाटील यांनी सोहळा घडवून आणला होता. ‘कुणी घर देता का घर’, ‘मंतरकैफ’, ‘वादळ घोंगावते आहे’ आणि ‘चौदा चौकड्याचं राज्य’ या ललित साहित्यकृतींचा त्रिपुराच्या राजभवनात शासकीय शिष्टाचारात प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मौनी विद्यापीठाचा अनुभव गाठीशी होताच. शिवाय, बंगळूर येथील टी.एम.ए.पै. यांची तांत्रिक शिक्षण संस्था १९६७ साली पाहून तशीच शिक्षण व्यवस्था महाराष्ट्रात केली पाहिजे, असा ध्यास त्यांच्या मनाला स्वस्थ बसू देत नव्हता. या त्यांच्या विचाराला पूरक व प्रेरणा देणारी घटना १९८३ साली घडली. मा. वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना विनाअनुदान तत्त्वावर तांत्रिक व वैद्यकीय शिक्षण संस्था सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला गेला. मा. रामराव आदिक यांच्या समर्थ पाठिंब्याने याची योग्य ती संधी मिळाली. त्यांनी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकला.