Dr. D. Y. Patil : देशाच्या शैक्षणिक, सामाजिक विकासात डॉ. डी. वाय. पाटील यांचे योगदान मोलाचे : मल्लिकार्जुन खर्गे

 Dr. D. Y. Patil :
Dr. D. Y. Patil : देशाच्या शैक्षणिक, सामाजिक विकासात डॉ. डी. वाय. पाटील यांचे योगदान मोलाचे : मल्लिकार्जुन खर्गे
Published on
Updated on

कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक कारकिर्दीत मिळालेल्या प्रत्येक जबाबदारीचे सोने केले. शिक्षण, समाजकारण, सहकार, राजकारण आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य देशासह महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी अत्यंत मोलाचे ठरले, अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मलिकार्जुन खर्गे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

बुधवारी दुपारी दिल्लीहून कोल्हापूर येथे आलेल्या खर्गे यांनी कसबा बावडा येथील निवासस्थानी जाऊन डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर डॉ. संजय पाटील, आ. सतेज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खर्गे म्हणाले, संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच मंगळवारी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. त्यामुळे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मी खास कोल्हापूरला आलो आहे. ते खऱ्या अर्थाने लोकाभिमुख नेतृत्व होते. शिक्षण, सहकार, समाजकारण, राजकारण आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला.

त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून डॉ. डी. वाय. पाटील यांनी जबाबदारी समर्थपणे पार पाडली. कोल्हापूरसारख्या शहरातून देशपातळीवर पोहोचून त्यांनी केलेल्या कार्याचा लाभ महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला झाला. त्यांच्या कार्याचा वारसा कुटुंबीयांनी यापुढेही याच समर्थपणे पुढे न्यावा, अशी अपेक्षाही खर्गे यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news