Dr. D.Y. Patil: अत्यंत निरभिमानी व्यक्‍तिमत्त्‍व असलेले भक्त

Dr. D.Y. Patil: अत्यंत निरभिमानी व्यक्‍तिमत्त्‍व असलेले भक्त
Published on
Updated on
परमात्मराज महाराज, श्री दत्त देवस्थान मठ, आडी

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची बातमी ही वेदनादायक ठरली. राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा इत्यादी क्षेत्रांमध्ये रमलेले हे व्यक्तिमत्त्व आध्यात्मिक विषयांमध्येसुद्धा तेवढेच रममाण होऊन जायचे. डॉ. डी. वाय. पाटील यांचे आडी येथील दत्त देवस्थानाशी एक विशेष उल्लेखनीय नाते होते. ते इ. स. २००६ पासून इथे सातत्याने येत असत. इथे आल्यावर नेहमी दीड-दोन तास बसायचे.

काही आध्यात्मिक विषय ऐकत राहण्यात त्यांना अतिशय आनंद वाटायचा. त्यांना या स्थानी येण्याची एवढी विलक्षण ओढ असायची की, कधीकधी दहा-वीस दिवसांच्या अंतरानेही ते यायचे. ते इथे भरपूर वेळा आले. ते शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत ख्यातनाम व्यक्तिमत्त्‍व होते. परंतु, इथे अत्यंत निरभिमानीवृत्ती ठेवून केवळ एक भक्त म्हणून येत असत. श्री दत्त जयंती महोत्सवातही ते अनेक वर्षे येत राहिले.

इ. स. २००९ मध्‍ये त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून निवड झाल्या झाल्या त्यांनी रात्री साडेअकरा वाजता फोन करून सांगितले, ‘महाराज, माझी गव्हर्नर म्हणून निवड झाली आहे.’ गव्हर्नरपदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा ते इथे आले. त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे राज्यपाल असतानाही ते इथे दरवर्षी दत्त जयंतीच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहत असत.

राज्यपालपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरही त्यांनी हा आध्यात्मिक संबंध तितक्याच श्रद्धेने जोपासला. ते केवळ एक मान्यवर पाहुणे म्हणून येत नव्हते, तर एक निष्ठावान भक्त म्हणून या स्थानी यायचे. या स्थानाबद्दल त्यांच्या मनात अपार श्रद्धा होती, अपार प्रेम होते. ते आपल्या भाषणांमध्ये अत्यंत भावुक होऊन म्हणायचे, ‘जोपर्यंत माझ्या शरीरात शक्ती आहे तोपर्यंत मी इथे आडीला महाराजांकडे येत राहील. अखेरच्या श्वासापर्यंत या पवित्र भूमीशी माझे नाते कायम टिकून राहील.’ मान. डॉ. डी. वाय. पाटील यांनी आता अखेरचा श्वास घेतला आहे. परंतु, या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाविषयीच्या आठवणी टिकून राहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news