

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांची ओळख शिक्षणसम्राट म्हणून जगभर पोहोचली; मात्र त्यापूर्वी ते काँग्रेसचे एक निष्ठावान, झुंजार आणि संघटनकुशल कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात नावारूपाला आले. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यापासून राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्ष, लोकसंपर्क आणि संघटनशक्तीच्या बळावर घडला. तीनवेळा मंत्रिपद हुकूनही त्यांनी सार्वजनिक जीवनातील ध्यास सोडला नाही. उलट राजकारणातून मिळालेला अनुभव समाजाच्या भवितव्यासाठी शिक्षण क्षेत्रात गुंतवत त्यांनी एक अभूतपूर्व शैक्षणिक चळवळ उभी केली. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द ही केवळ निवडणुकांची कहाणी नसून, समाजपरिवर्तनाच्या मोठ्या प्रवासाची पायाभरणी ठरली.
अवघ्या एकोणिसाव्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर घर, शेती आणि सामाजिक जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आल्या. या संकटातून बाहेर पडताना त्यांनी सार्वजनिक जीवनाची वाट निवडली. काँग्रेस पक्षात कार्यकर्ता म्हणून सुरुवात करताना त्यांच्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यासह तत्कालीन अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या विचारांचा प्रभाव होता. संघटनकौशल्य, लोकसंपर्क आणि कामाची तळमळ यामुळे त्यांनी अल्पावधीतच वेगळे स्थान निर्माण केले. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पन्हाळा-गगनबावडा विधानसभा मतदारसंघात त्यांनी १९६७ मध्ये काँग्रेसला विजय मिळवून दिला. १९७२ मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवत जनाधाराची पुनर्प्रचिती दिली. या काळात दुर्गम भागात रस्ते, वीज, रेशन व्यवस्था आणि मूलभूत सुविधांसाठी त्यांनी पाठपुरावा केला.
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. जिल्हा परिषद, मध्यवर्ती बँक, बाजार समित्या आणि विविध सहकारी संस्थांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार झाली. त्यामुळे ते जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावी सूत्रधार म्हणून उदयास आले. राज्याच्या राजकारणातही त्यांचा प्रभाव जाणवत होता. मुख्यमंत्रिपदाच्या नेतृत्वबदलाच्या घडामोडीत शंकरराव चव्हाण यांच्या नावासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे अनेक सहकाऱ्यांनी नमूद केले. विविध आमदारांना एकत्र आणणे, नेतृत्वासाठी पाठिंबा निर्माण करणे आणि संघटनात्मक समन्वय साधणे, ही त्यांची राजकीय ताकद होती. मात्र, याच टप्प्यावर त्यांच्या राजकीय आयुष्याला वेगळे वळण मिळाले. मंत्रिपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर असूनही अंतिम क्षणी त्यांना संधी मिळाली नाही.
१९७७ नंतरच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पक्षाचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली. करवीर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली; मात्र अत्यल्प मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्यानंतर १९८० च्या निवडणुकीतही अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना यश मिळाले नाही. तीनवेळा मंत्रिपद हुकले. राजकारणात अपयश आले, तरी त्यांनी कटुता स्वीकारली नाही. सार्वजनिक जीवनातून माघार घेताना त्यांनी स्वतःची ऊर्जा शिक्षण क्षेत्राकडे वळविली. पुढे त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. त्यांनी राजकारणात निष्ठा, नेतृत्व आणि लोकाभिमुख कार्याचा वेगळा आदर्श निर्माण केला. सत्तेची सर्वोच्च पदे त्यांच्या वाट्याला आली नाहीत; मात्र समाजकारणाचा त्यांचा ध्यास कधीच कमी झाला नाही. राजकारणातून मिळालेला अनुभव आणि दूरदृष्टी त्यांनी शिक्षण क्षेत्रात विलक्षण प्रभावीपणे वापरली. त्यातून लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी शैक्षणिक चळवळ उभी राहिली. म्हणूनच त्यांची खरी ओळख केवळ राजकारणी म्हणून नाही, तर समाजपरिवर्तनाला आयुष्य अर्पण करणारे दूरदृष्टीचे शिक्षणमहर्षी आणि राष्ट्रनिर्माते अशीच कायम स्मरणात राहील.
इंदिरा गांधी यांच्या बाजूने ठाम
१९६९ मध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या व्ही. व्ही. गिरी या उमेदवाराच्या बाजूने महाराष्ट्रातील काँग्रेसचे केवळ चार आमदार होते. यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील यांचा समावेश होता. या निवडणुकीत डॉ. पाटील यांनी इंदिरा गांधी यांच्यावरील अढळ निष्ठा दाखवून दिली. या निवडणुकीत व्ही. व्ही. गिरी हे विजयी झाल्यानंतर इंदिरा गांधींनी डॉ. डी. वाय. पाटील यांना दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयात भेटीसाठी बोलावले होते. देशातील अनेक मुख्यमंत्री भेटीसाठी वेटिंगला असताना इंदिरा गांधींनी डॉ. डी. वाय. पाटील यांना अर्धा तास भेट दिली होती.