Dr. D.Y. Patil: ज्ञानयज्ञाचा अखंड दीपस्तंभ

Dr. D.Y. Patil: ज्ञानयज्ञाचा अखंड दीपस्तंभ
Published on
Updated on

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे शैक्षणिक विश्वातील योगदान कालातीत आहे. कसबा बावड्यातील माध्यमिक शाळेच्या पुनरुज्जीवनापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संकुलांच्या उभारणीपर्यंत पोहोचला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या शिक्षणाच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला आधुनिक तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची जोड देत त्यांनी ज्ञानयज्ञ अधिक व्यापक केला. लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी, हजारो युवकांना रोजगार आणि समाजाला दर्जेदार शिक्षण संस्थांचे समृद्ध जाळे देणारा हा द्रष्टा शिक्षणमहर्षी आज काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्याने पेटविलेला ज्ञानाचा अखंड दीप पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील.

शिक्षणाची प्रेरणा त्यांना घरातूनच मिळाली. त्यांचे वडील यशवंतराव ऊर्फ आबा पाटील यांनी कसबा बावड्यात माध्यमिक शिक्षणाची गरज ओळखून छत्रपती राजाराम हायस्कूलची स्थापना केली होती. आबांच्या निधनानंतर आर्थिक संकटामुळे ही संस्था अक्षरशः अस्तित्वासाठी झुंज देत होती. अशावेळी १९६४ मध्ये अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर डी. वाय. पाटील यांनी शिक्षकांचे थकीत वेतन स्वतःच्या पैशातून दिले, शेती विभाग सुरू करून संस्थेचे उत्पन्‍न वाढविले, देणग्या मिळविल्या, शहाजी महाराजांकडून मिळालेल्या जमिनीच्या माध्यमातून नवीन इमारत उभी केली आणि पालकांचा विश्वास पुन्हा संपादन करून हायस्कूलला नवजीवन दिले. गणेश विद्यालयासारखी प्राथमिक शाळा संस्थेशी जोडून विद्यार्थ्यांचा प्रवाह वाढविला. शिक्षकांनी उच्च शिक्षण घ्यावे, गुणवत्तावाढ करावी, यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले; संस्कृतचे अभ्यासक वेदमूर्ती सीताराम सप्रे यांच्यासह अनेक शिक्षकांना त्यांनी संधी दिली.

१९७५ मध्ये गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठ गंभीर संघर्षात अडकले असताना डी. वाय. पाटील यांनी अध्यक्षपद स्वीकारले. कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यातील संघर्ष संवादाने मिटवून त्यांनी संस्थेला लोकशाही व्यवस्थापनाची नवी घटना दिली. ग्रामीण भागातील शाळा सुरू करणे, मुलींच्या वसतिगृहाला मान्यता मिळवून देणे, बंद होणारे अभ्यासक्रम वाचविणे, डीसीआरई पॉलिटेक्निक आणि इतर शैक्षणिक केंद्रे टिकविणे, गरीब विद्यार्थी निधीसाठी स्वतःचे मानधन देणे, नोकरभरतीत पारदर्शकता ठेवणे आणि कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती मिळवून देणे अशा अनेक निर्णयांमुळे मौनी विद्यापीठाला नवे स्थैर्य मिळाले. या काळात त्यांनी शेकडो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आणि ग्रामीण शिक्षणाला भक्कम पाया दिला.

राजकारणातून बाहेर पडत त्यांनी शिक्षण हेच आयुष्याचे ध्येय स्वीकारले. वसंतदादा पाटील यांच्या प्रोत्साहनातून १९८३ मध्ये रामराव आदिक एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून नवी मुंबईत पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. त्यानंतर पुणे, कोल्हापूर आणि नवी मुंबई येथे अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, वैद्यकीय, दंतवैद्यक, आयुर्वेद, फार्मसी, नर्सिंग, कायदा, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध शाखांतील संस्थांचे विस्तृत जाळे उभे राहिले. संस्था उभारताना त्यांनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवली; मात्र प्रयोगशाळा, ग्रंथालये, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि दर्जेदार प्राध्यापक याबाबत कोणतीही तडजोड केली नाही. मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे उभ्या राहिलेल्या त्यांच्या शैक्षणिक संकुलांनी लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.

तंत्रशिक्षणाबरोबरच वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेतही त्यांनी मोलाची भर घातली. नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे वैद्यकीय महाविद्यालये, दंत महाविद्यालये, संशोधन केंद्रे आणि अत्याधुनिक रुग्णालये उभारून नाममात्र शुल्कात उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शुल्क सवलत, शैक्षणिक कर्ज, मोफत शिक्षण आणि पालकत्व देण्याची सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे स्वतंत्र अभिमत विद्यापीठे उभी राहिली. ‘ज्ञानाधीनं जगत् सर्वम्’ या ब्रीदवाक्याला साजेशा या कार्यातून त्यांनी महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे शिक्षणविश्व दिले. कसबा बावड्यातील एका शाळेच्या पुनरुत्थानापासून सुरू झालेला हा ज्ञानयज्ञ आज हजारो शिक्षक, लाखो विद्यार्थी आणि असंख्य कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाश पसरवत आहे. म्हणूनच डॉ. डी. वाय. पाटील हे केवळ शिक्षण संस्थांचे संस्थापक नव्हते; ते आधुनिक महाराष्ट्राच्या शैक्षणिक पुनर्जागरणाचे खरे शिल्पकार ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news