kolhapur | गर्भलिंग निदानपासून गर्भपातपर्यंत डॉ. चंद्रकांत गायकवाडचे नेटवर्क !

kolhapur |
kolhapur | गर्भलिंग निदानपासून गर्भपातपर्यंत डॉ. चंद्रकांत गायकवाडचे नेटवर्क !
Published on
Updated on

आशिष आडिवरेकर

कोल्हापूर : तीनशेहून अधिक स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्या डॉ. चंद्रकांत गायकवाडचे अनेक कारनामे पुढे येऊ लागले आहेत. गर्भलिंग निदानापासून गर्भपाताचे स्वतःचे असे एक नेटवर्कच डॉ. गायकवाडने उभे केले होते. सांगली, मिरजसह कर्नाटकपर्यंत हे रॅकेट पसरले असून यासाठी ६ ते ७ एजंट सक्रिय होते. केवळ व्हॉटस्‌ ॲप कॉलद्वारे रुग्णांशी संपर्क करून मदतनीस शब्बीरच्या सहाय्याने तो हे सर्व नेटवर्क हाताळत होता. गर्भलिंग निदान करून आलेल्या महिलांची पुन्हा तपासणी करून तत्काळ गर्भपात करण्यासही महिलांना सांगत होता.

ना केसपेपर, ना ऑनलाईन पेमेंट

सरकारी नोकरी बजावल्यामुळे डॉ. गायकवाडला कायद्याच्या पळवाटा माहिती होत्या. त्यामुळे त्याने गर्भलिंग आणि गर्भपात केल्याचे काहीच रेकॉर्ड ठेवले नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गर्भपातासाठी येणाऱ्या पेशंटची कोणतीच कागदोपत्री माहिती राहू नये, यासाठी तो केसपेपर करत नव्हता. याचसोबत जास्तीत जास्त रोख व्यवहारावर त्याचा भर होता.

गर्भपाताचा निर्णय जागेवरच

बोगस डॉ. स्वप्निल पाटील याच्याकडून गर्भपातासाठी आलेल्या महिलांची डॉ. गायकवाड पुन्हा तपासणी करत होता. तपासणी निगेटिव्ह आल्यास (स्त्री गर्भ) पेशंटना तत्काळ गर्भपाताचा सल्ला देत होता. गर्भपात करण्यापूर्वी संबंधित महिलांची अन्य कोणतीही वैद्यकीय तपासणी करत नसल्यामुळे अनेक महिलांची प्रकृतीही खालावली होती. डॉ. गायकवाड गर्भपातासाठी लागणाऱ्या एमटीबी किटचा मुबलक साठा करून ठेवत असल्याची माहिती त्याचा साथीदार शब्बीर हजारी याच्या चौकशीतून समोर आली आहे.

व्हॉटस्‌ॲपवर साधायचा संपर्क

डॉ. गायकवाड नेहमी पेशंटना शब्बीरसोबत संपर्क करण्याचा सल्ला देत होता. स्वत: एखाद्या पेशंटला फोन करायचा असल्यास तो व्हॉटस्‌ॲपद्वारे संपर्क साधत होता. नियमित फोन केल्यास केवळ या तारखेला दवाखान्यात या, असा सल्ला देऊन फोन कट करत होता.

६ ते ७ सक्रिय एजंट

डॉ. गायकवाड याचे गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे स्वत:चे रॅकेट होते. कोल्हापूरसह सांगली, मिरज, कर्नाटक परिसरात त्याचे ६ ते ७ सक्रिय एजंट होते. गायकवाडचा मदतनीस शब्बीर देखील एजंट म्हणून काम करत होता. तो गायकवाडचे सर्व नेटवर्क सांभाळत होता. याचसोबत बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील, एजंट आश्विनी शिंदे हेदेखील त्याच्याकडे गर्भपातासाठी महिलांना पाठवत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news