

वारणानगर : माणसांची तोंडे बंद केली किंवा त्यांचे अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य संपविले, तर ती माणसं कृतिशील होऊन विध्वंसक बनू शकतात. असंच देशात चाललंय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा व ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी येथे व्यक्त केले.
वारणा महिला समूहाच्या माजी अध्यक्षा शोभाताई कोरे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त वारणा समूहातर्फे दिला जाणार ‘शोभाताई कोरे महिला जीवनगौरव पुरस्कार’ डॉ. भवाळकर यांना वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व वारणा महिला समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते प्रदान केला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ‘वनशोभाश्री’ पुरस्कार शेडशाळ येथील डॉ. आप्पासाहेब पाटील महिला देशी वाण संरक्षण व संवर्धन सहकारी बीज बॅंकेच्या अध्यक्षा शामशादबी इब्राहिम पठाण यांना प्रदान करण्यात आला.
डॉ. भवाळकर म्हणाल्या, माणसाच्या देहात ज्ञान बाहेरून आत जात नाही, तर माहिती जाते आणि आतून ज्ञान बाहेर यावे लागते, तरच ते स्फुरते. लोकसंस्कृती संपली असे गळे काढणाऱ्यांनी जुनं सगळं सोनंच असतं असं नाही किंवा नवीन वाईट असते असे नाही तर ते मन आणि बुद्धीने स्वीकारले पाहिजे. परंपरेप्रमाणे बोलण्यानेच मराठी भाषेची श्रीमंती वाढते.
ईशानी कोरे यांनी स्वागत करून दिव्य शोभाई जागर स्त्री शक्तीचा या स्मृती पर्वात झालेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. शामशादबी पठाण, जि. प. सदस्या स्नेहल वेल्हाळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार अशोकराव माने, वारणा दूध संघाचे अध्यक्ष एच. आर. जाधव, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. अस्मीता कोल्लूर, श्रुती कोरे, वारणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत, सुधीर कामेरीकर, सभापती शीतल यादव, मनीषा माने, मनीषा संकपाळ उपस्थित होते.