

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याच्या विविध पैलूंवर संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. त्याच्यावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात आले असून डॉ. आंबेडकर यांचे कार्य समाजासमोर आणले आहे.
डॉ. आंबेडकरांच्या साहित्यातील बुद्ध तत्त्वज्ञानावर आधारित प्रतिद्यसमूदपाक या सिद्धांतावर डॉ. ज. रा. दाभोळे यांनी संशोधनात्मक लेखन करून त्यावर ‘पतीतसमुद्पाद ः द थेरी ऑफ डिपेंडंट ओरिजिनेशन’ असा ग्रंथ प्रकाशित केला आहे. अनित्यवाद, अनात्मवाद आणि प्रतित्यसमुत्पाद इत्यादी मुद्द्यांवर विवेचन केले आहे. प्राचार्य डॉ. डी. टी. खाबडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवी समानता व न्यायाच्या संदर्भात बौद्धिक योगदानाबद्दल लेखन केले असून ते ‘द सोशल रिफॉर्म मोमेंट अँड डॉक्टर आंबेडकर इंटरॅक्शन इंटेल जस्टिफिकेशन फॉर ह्यूमन इक्वॅलिटी अँड जस्टिस’ या पुस्तकामध्ये प्रकाशित झाले आहे.
सुधाकर गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची सिद्धांतिक बांधणी विचारात घेऊन ‘दलित सौंदर्यशास्त्र’हे पुस्तक लिहिले आहे. सौंदर्याच्या मूळ संकल्पना मागील मूलतत्त्वे, कांटचा सौंदर्य सिद्धांत, हिंदू संस्कृती व डॉ. आंबेडकर आणि दलित सौंदर्यशास्त्राची बांधणी यावर गायकवाड यांनी सखोल विश्लेषण केले आहे. डॉ. दीपा श्रावस्ती यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील स्त्रिया या विषयावर ‘वुमेन्स इन डॉ. आंबेडकरज मुव्हमेंट’ हा ग्रंथ लिहिला असून तो प्रकाशित झाला आहे. या विषयावरील इंग्रजीतील हे पहिलेच पुस्तक आहे. डॉ. दत्ता भगत यांनी स्वातंत्र्य चळवळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या विषयावर महत्त्वाचे संशोधन केले आहे. बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचे प्रश्न घेऊन लढत होते व गांधीजींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला नाही, असा आक्षेप त्यांच्यावर नेहमी घेतला जातो; परंतु आयुष्यभर डॉ. आंबेडकर हा देश कसा निर्माण होईल आणि देशातील सर्वांचा सहभाग तो चालवण्यासाठी कसा असेल, यासाठी वेळोवेळी भारताबाबतची स्वतःची भूमिका मांडत आले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी कसे योगदान दिले, याचा महत्त्वपूर्ण मागोवा या पुस्तकात घेतला आहे.