

कोल्हापूर : पुण्यासह कोकण, मराठवाडा, विदर्भात घरफोडी, जबरी चोरी आणि महिलांना हिसडा मारून दागिने चोरीचे डझनभर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या परभणी आणि लातूर जिल्ह्यांतील कुख्यात चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ बेड्या ठोकल्या. राम ज्ञानोबा केंद्रे (वय 27, रा. मौजे खोकलेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी), मनोज शिवाजी लंगडे (34, तगरखेडा पोस्ट औराद शहाजनी, ता. निलंगा, लातूर) अशी त्यांची नावे आहेत.
संशयित राम केंद्रे याच्यावर पुणे, रायगड, लातूर, सोलापूर जिल्ह्यांत 12 गुन्हे तर मनोज लंगडे याच्यावर पुणे शहरासह कोंडवा पोलिस ठाण्यात रेकॉर्ड असल्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. भुदरगड जिल्ह्यातील दोन गुन्ह्याची कबुली दिल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. चोरट्यांकडून 2 लाख 70 हजार किमतीचे दागिने हस्तगत केले. आदमापूर (ता. भुदरगड) येथील शेतात काम करणार्या लक्ष्मीबाई सर्जेराव भोसले (वय 67) व लक्ष्मी दिनकर पाटील याच्याकडे पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाणा करून चोरट्याने त्याच्याकडील सोन्याचे दागिने लंपास केले होते. दि.7 डिसेंबरला दुपारी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने चोरट्याचा छडा लावला. संशयितांचा पुणे-बंगळूर महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ पानाच्या टपरीजवळ वावर असल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह पथकाने चोरट्यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.