

कागल : मी मुख्यमंत्री झालो तर नियमित कर्ज परतफेड करणार्या शेतकर्याला प्रोत्साहन रक्कम दुप्पट करू. त्याला एक लाख रुपये देऊ, असे वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. वंदूर (ता. कागल) येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कर्जमाफी करणार म्हटल्यावर शेतकरी कर्ज भरत नाहीत आणि बँका अडचणीत येतात. प्रहारचे बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केले तर 32 हजार कोटी रुपये सोसायट्यांचे थकले आहेत, असेही त्यांनी सांगितले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्यांनी हिम्मत आणि बहादुरी दाखवली आहे. गतवर्षी 90 टक्के असणारी वसुली यावर्षी 91 टक्के झाल्याचे सांगत त्यांनी शेतकर्यांचे कौतुकही केले.
मुश्रीफ म्हणाले, महायुती सरकारने शेतकर्यांना निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते. त्यानुसार लाडकी बहीण योजना सुरू केली. शेतकर्यांचे कर्ज माफ करणार आहे. लाडक्या बहिणीसाठी या वर्षभरासाठी 46 हजार कोटी रुपये लागणार आहेत. अडचण असली तरी अनेक कर्जमाफीच्या योजना केल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा संदर्भ देत मुश्रीफ यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, लोकशाहीत मतदार सर्वश्रेष्ठ आहे. लोकशाहीमध्ये जनतेला आणि वार्याला लाथा मारून चालत नाही. निवडणुकीत जय-पराजय होत असतात. पण मतदार हाच सर्वश्रेष्ठ असतो. या निवडणुकीत जातीयवादाचा विद्वेष पसरवून तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न झाला. माझा जन्म कोणत्या घरात झाला हे माझ्या हातात नव्हते. पण मी जनतेशी कसा वागलो, हे महत्त्वाचे आहे.
ते म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर मला आणि माझ्या कुटुंबीयांना ईडीच्या चौकशीत अडकवून तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला. अनेक संकटे आणि विषारी प्रचार करूनही जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. ‘ना मै गिरा, ना मेरे हौसले गिरे, लेकीन मुझे गिराने में लोग कई बार गिरे’ या शायरीतून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, हसन मुश्रीफ केवळ विकासकामे करत नाहीत, तर सामान्य माणसाच्या दुःखात सहभागी होऊन ते कमी करण्याचा प्रयत्न करतात. अशा तळागाळातील नेत्याला निवडणुकीत कमी मते मिळणे हे दुर्दैवी आहे. ही मते कुठे गेली, याचे संशोधन करण्याची गरज आहे.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती रमेश तोडकर, सरपंच सौ. धनश्रीदेवी घाटगे यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जमाफीबाबत माझे मत वेगळे आहे. कर्जमाफी करणार म्हटल्यानंतर शेतकरी कर्जच भरत नाहीत. बँका अडचणीत येतात. थकबाकी राहिली तर बँका बुडून जातील. पण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. 91 टक्के कर्ज फेड करून येथील शेतकर्याने तो कष्टाळू आणि स्वाभिमानी आहे, त्याला फुकटचे काहीही नको आहे, हे दाखवून दिले आहे, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.