

Doodhganga River Flood Dattawad Bridges
दत्तवाड: मागील पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दूधगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे या नदीवरील महाराष्ट्र व कर्नाटकला जोडणारे दत्तवाड - एकसंबा व दत्तवाड - मलिकवाड ही दोन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यातून या मार्गावरून सुरू असलेली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
जवळचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात दोन्ही राज्यातून नेहमी वाहतूक सुरू असते. मात्र, बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दोन्ही राज्यातील नागरिकांना किमान पाच ते सात किलोमीटर अधिक अंतरावरून प्रवास करावा लागणार आहे.
सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून अशीच वाढ सुरू राहिल्यास लवकरच नदीकाठची गवताची कुरणे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुपालकांना जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची नदीकाठची वीजपंप सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी एकच धांदल उडाली आहे.