

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोरटकरला ज्या पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे त्याच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली आहे. कोरटकरला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये यासाठी सीसीटीव्ही तपशीलची मागणी करण्यात येत आहे. कोरटकरला गादी, चादर आणि मच्छरचा त्रास होत असल्यास त्याला तशी व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नये अशी मागणी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी पत्राद्वारे केली आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आली. अनेक दिवसांपासून तो फरार होता. तेलंगणातून कोल्हापूर पोलिसांनी त्याला (दि.२४) रोजी ताब्यात घेतले.
सोमवारी (दि.२४) तेलंगणातून अटक केली होती. कोल्हापूर पोलिसांनी (दि.२५) रोजी न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कोरटकर यांने पोलीस तपासात मदत केली नाही. सावंत यांना फोनवरून धमकी दिलेला आवाज माझा नाही, असा दावा कोरटकरने न्यायालयात केला आहे. त्यामुळे त्याच्या आवाजाचे नमुने घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली . कोरटकर चंद्रपूर पोलिस मुख्यालयाच्या समोर राहत होता. पोलिसांच्य़ा जवळ राहून तो फरार असेल, तर याची चौकशी केली पाहिजे. आमची लढाई कोरटकर सारख्या प्रवृत्तीविरोधात आहे. इतर लोकांनी कोरटकरला मदत केली, याची चौकशी केली पाहिजे.
दरम्यान, कोरटकरने कोल्हापूर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचा जामीन अर्ज मंजूर झाल्याने ११ मार्चपर्यंत त्याला दिलासा मिळाला होता. पण, कोल्हापुरातील सामाजिक संघटनांच्या दबावानंतर पोलिसांनी कोरटकर याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता. त्यानंतर आणि त्यापुर्वीही कोल्हापूर पोलिसांनी नागपूरला धाव घेत कोरटकर याचा शोध सुरू केला होता. तथापि, त्याने सुरुवातीला मध्य प्रदेशात पळ काढल्याची चर्चा होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कोरटकर याने सुरुवातीला पश्चिम बंगाल आणि त्यानंतर दुबईत पळ काढल्याची चर्चा होती. तथापि, त्यानंतर त्याच्या पत्नीनेच त्याचा पासपोर्ट जमा केल्यानंतर कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याचे स्पष्ट झाले होते.