

कोल्हापूर : गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बंडाचा झेंडा फडकविल्यानंतर गोकुळच्या नेत्यांनी त्यांना एकाकी पाडण्यात यश मिळविले. आता महायुतीचाच अध्यक्ष करणार, असा निर्णय नेत्यांनी घेतल्याने डोंगळे यांनी राजीनाम्याची तयारी दाखवल्याचे समजते. महायुतीचा अध्यक्ष होत असल्याने आपली मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे राजीनामा देण्यासाठी परवानगी द्या, अशी विनंती ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून करणार आहेत. मंगळवारी ही भेट होण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांची अध्यक्षपदाची मुदत पूर्ण झाली असल्याने ठरल्यानुसार दि. 15 मे रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आपला अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी नेत्यांची अटकळ होती. मात्र डोंगळे यांनी थेट फडणवीस आणि शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर महायुतीचा अध्यक्ष होत असेल तरच आपण राजीनामा देऊ आणि तोही फडणवीस आणि शिंदे यांनी सांगितल्यावरच देऊ, अशी जाहीर भूमिका घेतली.
डोंगळे यांच्या बंडाने गोकुळचे नेते अस्वस्थ झाले. या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी नेत्यांनी बैठका घेऊन सहकारात पक्ष नसतो, अशी भूमिका मांडली. गोकुळमध्ये सत्तांतरात जे घटक पक्ष सहभागी होते, त्यांनी व त्यांच्या नेत्यांनी एकजूट दाखविल्यामुळे डोंगळे एकाकी पडले. 21 पैकी 18 संचालक थेट नेत्यांसमवेत राहिले. अविश्वास ठराव आणल्याशिवाय डोंगळे यांना हटविता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या अस्त्रांचा वापर करण्यात आला. याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. त्यावेळी स्थानिक दूध संघाच्या राजकारणात जिल्हा पातळीवरच्या नेत्यांना निर्णय घेऊ द्यावा, अशी विनंती केल्याचे समजते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेचा प्रचार करणार्या डोंगळे यांची एकनाथ शिंदे यांनी समजूत काढावी याची जबाबदारी पालकमंत्री प्रकाश आबीटकर व आमदार चंद्रदीप नरके यांच्यावर सोपविण्यात आली. याच दरम्यान गवसे येथील एका विवाह समारंभात गोकुळचे नेते हसन मुश्रीफ व अरुण डोंगळे यांची समोरासमोर भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. चर्चेत महायुतीच्या घटक पक्षाचाच अध्यक्ष होईल अशी भूमिका मुश्रीफ यांनी मांडल्याचे समजते. त्यावर डोंगळे यांनी महायुतीचा अध्यक्ष होणार असेल तर आपण मंगळवारी मुंबईत नेत्यांना भेटून तसे सांगू आणि राजीनाम्याची परवानगी मागू अशी तयारी दाखविल्याचे समजते. याला मुश्रीफ व डोंगळे या दोघांकडूनही दुजोरा मिळाला नसला तरी त्यांची भेट झाल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.
गवसे येथील एका विवाह समारंभास हसन मुश्रीफ आणि अरुण डोंगळे यांची व्यासपीठावर समोरासमोर भेट झाली. डोंगळे यांनी मुश्रीफ यांना आदराने नमस्कार केला. तेव्हा ‘अरुण तिकडं कुठं गेलास, तुझं काय म्हणणं होतं ते माझ्याकडे येऊन मला सांगायचं होतं. त्यासाठी मुंबईला जायची काय गरज होती. ठीक आहे. आता नेत्यांना भेटून महायुतीचा अध्यक्ष होणार असं सांग’, असे हसन मुश्रीफ डोंगळे यांना म्हणाल्याचे सांगण्यात येते.