.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोल्हापूर : जादा परताव्याच्या आमिषाने कसबा बावड्यातील डॉक्टर दाम्पत्यासह नातेवाईकांना तब्बल एक कोटीचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात वैभव वामन जोशी, तेजस शामराव जोशी, आकाश शरद एकल, वंदना वामन जोशी, स्वाती वैभव जोशी, रुपेश दत्ता गायकवाड, लाईफमार्क रिअल इस्टेट अँड प्रा. लि. कंपनी, नेचर हिल अॅग्रो प्रा. लि. कंपनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यांना अटक झालेली नाही.
डॉ. मनोज सुनील गायकवाड (वय 38, रा. जमादार टॉवर्स, शाहू सर्कलजवळ, कसबा बावडा) यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. 28 सप्टेंबर 2021 ते 8 मार्च 2023 या कालावधीत ही घटना घडली. पोलिस निरीक्षक संतोष डोके अधिक तपास करत आहेत. डॉ. गायकवाड यांचे चुलत भाऊ प्रतीक अजित गायकवाड यांनी 28 सप्टेंबर 2021 रोजी त्यांचा मित्र वैभव वामन जोशी याची ओळख करून दिली. जोशी याने, तो लाईफमार्क रिअल इस्टेट अँड प्रा. लि. कंपनीचा संचालक असून, कंपनीद्वारे जागा खरेदी-विक्री करणे, जागा विकसित करणे, प्लॉटस् पाडणे वगैरे कामे करत असल्याचे सांगितले.
तसेच, कंपनीचे ऑफिस ओंकार अपार्टमेंट, बेलबाग येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींनी लाईफमार्क रिअल इस्टेट अँड प्रा. लि. कंपनी, नेचर हिल अॅग्रो प्रा. लि. कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याला 10 टक्के परतावा मिळेल, असे गायकवाड यांना सांगितले. त्यानुसार गायकवाड यांनी रोख 25 लाख 70 हजार, गुगल पेद्वारे 7 लाख 50 हजार असे एकूण 41 लाख 50 हजार रुपये वैभव जोशी व त्याच्या सहकार्यांकडे दिले.
वैभव जोशी व त्याच्या सहकार्यांच्या सांगण्यावरून गायकवाड यांच्या पत्नी डॉ. अमृता मनोज गायकवाड यांच्याकडून गुगल पे व रोख रक्कम 15 लाख 70 हजार रुपये घेतले. तसेच, गायकवाड यांचा चुलत भाऊ अजित गायकवाड यांच्याकडून गुगल पे व रोख 15 लाख 29 हजार रुपये, प्रतीक अजित गायकवाड यांच्याकडून गुगल पे व रोख 7 लाख आणि गायकवाड यांचा मित्र श्रीपाद जनार्दन साळोखे यांच्याकडून गुगल पे व रोख 19 लाख 47 हजार असे एकूण 98 लाख 96 हजार रुपये घेतले. परंतु, महिन्याला 10 टक्के परतावा दिला नाही. परतावा मागणी केल्यानंतर पुढील गुंतवणूक करा, मग परतावा मिळेल, असे म्हणू लागले. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतविली. मात्र, काही महिन्यांनंतरही परतावा मिळत नसल्याने बेलबागेत गायकवाड गेले असता, तेथे ऑफिस नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले, असे पोलिसांनी सांगितले.