

पेठवडगाव : येथील डॉक्टरची औषध विक्री आणि आर्थिक व्यवहारांमध्ये तब्बल एक कोटी ८६ लाख २ हजार ६६४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संग्राम सुरेश पाटील (रा. कापूरवाडी, ता. हातकणंगले) आणि शुभम रामराव पाडळे (रा. सावर्डे, ता. हातकणंगले) या दोघांविरोधात पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
डॉ. राकेश अशोक पाटील यांचे वडगाव येथे रुग्णालय आहे. या रुग्णालयात असणाऱ्या आशीर्वाद मेडिकल आणि आशीर्वाद डिस्ट्रीब्युटर येथे संशयित संग्राम पाटील व शुभम पाडळे हे फार्मासिस्ट म्हणून काम पाहात होते. या व्यवसायांतील औषध खरेदी-विक्री, बँक व्यवहार, जीएसटी भरणा, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि वार्षिक ऑडिटची जबाबदारी संशयितांकडे विश्वासाने सोपवली होती. नोव्हेंबर २०२२ पासून हा व्यवहार सुरू होता. मात्र, काही दिवसापूर्वी औषध विक्रीच्या नोंदी, संगणकीय स्टॉक आणि प्रत्यक्ष औषध साठा यांची तपासणी केली असता मोठी तफावत आढळून आली.
औषध विक्रीतून मिळालेली रक्कम बँक खात्यावर जमा न करणे, तसेच संगणकीय नोंदींमध्ये औषधांचा साठा अधिक दाखविणे असे प्रकार झाल्याचा संशय येताच डॉ. पाटील यांनी सन २०२२ ते २०२६ या कालावधीतील औषध खरेदी-विक्री आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली असता संशयितांनी परस्पर औषध विक्री करून त्याच्या नोंदी संगणकीय प्रणालीतून हटविल्याचेही निदर्शनास आले. तसेच वितरकांकडून औषधे खरेदी केल्याचे दाखवून प्रत्यक्षात कमी औषधे मिळणे, विक्रीची रक्कम संबंधित खात्यांवर जमा न होणे आदी प्रकार घडला. दोघांनी मिळून १ कोटी ८६ लाख २ हजार ६६४ रुपयांची फसवणूक केल्याचे लक्षात येताच डॉ. पाटील यांनी फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक गोरख चौधर तपास करत आहेत .